Vari Pandharichi 2025: चालता पाऊल पंढरीच्या वाटे। ब्रह्मसुख भेटे रोकडेचि।।, आनंद वारी
तुकोबांची कीर्ती ऐकून त्यांनी तुकोबांना मनोमन गुरु मानले
By : ह.भ.प. अभय जगताप
सासवड :
चालता पाऊल पंढरीच्या वाटे।
ब्रह्मसुख भेटे रोकडेचि ।।
पहाता ऐसे सुख नाही त्रिभुवनी
ते पहावे नयनी पंढरीसी ।।
गाता हरिनाम वाजविता टाळी
प्रेमाचे कल्लोळी सुख वाटे ।।
दिंडीचा गजर होतो जयजयकार
मृदंग सुस्वर वाजताती ।।
हमामा टिपरी पालिती हुंबडी।
होवोनिया उघडी विष्णुदास।।
बहेणि म्हणे ऐसा आनंद वाटेचा
कोण तो दैवाचा देखे डोळा।।
या अभंगांमध्ये संत बहिणाबाईंनी वारकऱ्यांना पंढरीच्या वाटेवर मिळणारा आनंद वर्णन केला आहे. संत बहिणाबाई म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या शिष्या. त्या तुकोबांच्या समकालीन होत्या. तुकोबांची कीर्ती ऐकून त्यांनी तुकोबांना मनोमन गुरु मानले. पण हे त्यांच्या पतीला रुचले नाही.
त्यामुळे त्यांनी प्रसंगी पतीचा मार्ग मारही खाल्ला. पुढे त्यांच्या पतीचे मतपरिवर्तन झाल्यावर ते सर्व तुकोबांना भेटायला देहूला आले आणि तुकोबांच्या सान्निध्यात काही काळ राहिले. या अभंगामध्ये त्यांनी पंढरपूरच्या वारीत चालतानाचा आनंद वर्णन केला आहे.
या वाटेवर ब्रह्मसुख रोकडे म्हणजे रोख मिळत आहे. हे सुख तुम्हाला त्रिभुवनात मिळणार नाही, असा बहिणाबाईंचा दावा आहे. वारकरी टाळ्या वाजवत, हरिनाम गात चालले आहेत. मृदुंग आणि वीण्याच्या नादावर वारकरी गात आहेत. गाता गाता वारकरी हमामा हुमरी टिपरी असे खेळ खेळत आहेत.
नाचत आहेत. तुकोबांनी सुद्धा पंढरपूरला जाताना ‘नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळीया’ असे म्हटले आहे. आजही पंढरीच्या वाटेवर भजन करताना वारकरी पावली खेळतात. भजन करताना मानवी मनोरे करतात. या मनोऱ्यावर कधी पखवाजवादक उभा असतो तर कधी पताकाधारी वारकरी.
कधी सात-आठ वारकरी एकत्र येऊन बैलगाडीची रचना करतात. बैलं, गाडी सर्व मानवी असतात. त्यावर उभा राहिलेला वारकरी उपरण्याने ही गाडी हाकतो आणि ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या गजरामध्ये ही बैलगाडी पुढे मागे जाते. रिंगणामध्ये घोड्यांची दौड बघण्यासारखी असतेच पण त्याच्या आधी पताकाधारी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी, वीणेकरी हे सुद्धा स्वतंत्रपणे धावतात.
धावताना आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत असतो. रिंगणानंतर उडीचा खेळ होतो. यामध्ये बसून, झोपून टाळ वाजवतात. चिखल असेल तरी त्या चिखलात लोळतात. लहान मुलांच्या चेहऱ्यावर जो निरागस आनंद दिसतो तो इथे आबालबुद्ध स्त्राr-पुरुषांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. हुतूतू, खोखो असे खेळ टाळांच्या गजरात खेळले जातात.
फुगडी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे घालतात. एका हाताने खेळलेली फुगडी, चौघांनी एकत्र येऊन खेळलेली फुगडी, एकजण उभा तर एकजण बसून खेळलेली फुगडी. विसाव्याच्या ठिकाणी सूर पारंब्या खेळतात. महिला वारकरी ओव्या गात फेर धरतात. पंढरपूर जवळ आल्यावर धावा होतो.
उताराचा रस्ता बघून ‘तुका म्हणे धावा। आहे पंढरी विसावा’ हे चरण म्हणून वारकरी उतारावरून धावत सुटतात. माहेरी निघालेली सासुरवाशीण जशी आनंदात असते, तसे हे वारकरी आनंद लुटत पंढरपूरला जातात.