Vari Pandharichi 2025: रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, इंदापुरात तुकाबांच्या पालखीचे रिंगण
शेकडो वारकऱ्यांसह परिसरातील भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली
पुणे : निमगाव केतकीचा निरोप घेऊन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूरमध्ये पोहोचला. तुकोबांच्या पालखीचे दुसरे अश्व रिंगण रविवारी इंदापूरमधील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडले. यावेळी शेकडो वारकऱ्यांसह परिसरातील भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती.
आषाढी वारी जवळ येत आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या आता पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. निमगाव केतकीचा निरोप घेऊन जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा पालखी सोहळा रविवारी सकाळी इंदापूरच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पालखीला खांदा दिल्यानंतर सोहळ्यान प्रस्थान ठेवले.
टाळ मृदुंगाचा गजर, आसमंतात फडकणाऱ्या पताका, श्री विठुरायांच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडले. भगव्या पताकाधारी वारकरी, तुळशी वृंदावर डोईवर घेतलेल्या महिला, वीणेकऱ्यांनी सुऊवातील प्रदक्षिणा घातली. त्यानंतर मानाच्या अश्वांचे आगमन झाले. पालखीचा मुक्काम इंदापुरातच असून सोमवारी पालखी सराटीच्या दिशेने मार्गस्थ होईल.
‘ग्यानबा-तुकाराम’चा नामघोष
पालखी इंदापुरात येताच वारकऱ्यांनी ‘ग्यानबा-तुकाराम’च्या नामघोषावर ठेका धरला. टाळकरी, वीणेकरी, झेंडेकरी यांच्यापाठोपाठ तुळशी वृंदावन डोक्यावर पेलत महिला मंडळी जोमाने धावल्या. डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच मानाच्या अश्वाने रिंगण पूर्ण केले.
‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’ची गर्जना झाल्याबरोबर लोकांनी घोड्याच्या टापांखालची माती मस्तकी लावली. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्री-पुरुष असा भेद विसरून सर्व वारकरी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करत होती.