Vari Pandharichi 2025: तुका म्हणे धावा। आहे पंढरी विसावा।।, बोंडलेत संत तुकारामांचा धावा
धाव्याच्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती
माळीनगर : बोरगाव (ता. माळशिरस) येथील मुक्काम आटोपून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा माळखांबी मार्गे पिराची कुरोली (ता. पंढरपूर) या मुक्कामाच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झाला. दरम्यान, सोहळ्यातील महत्त्वाचा असा धावा बोंडले (ता. माळशिरस) येथील उतारावर मोठ्या उत्साहात पार पडला.
बोंडले येथील उजनी कालव्याच्या टेकडीवर पालखी सोहळा आल्यानंतर धावा होणाऱ्या ठिकाणी पालखी सोहळा थांबविण्यात आला. सोहळा प्रमुख आणि चोपदर पुढे आले त्यांनी दिंड्या लावल्यानंतर
तुका म्हणे धावा। आहे पंढरी विसावा।। हा अभंग झाल्यानंतर पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले लाखो वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाचा जयघोष करीत भक्तिमय आणि अत्यंत आनंदी वातावरणात वाऱ्याच्या वेगाने देहभान विसरून पंढरीच्या ओढीने उतारावऊन बोंडले गावाच्या दिशेने धाव घेतली. धाव्याच्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती
धावा उरकून दुपारी एकच्या सुमारास संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बोंडले येथे दुपारच्या विसाव्यासाठी विसावला. यावेळी बोंडले ग्रामस्थांकडून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास तोफांची सलामी देण्यात आली. तर श्रीफळ आणि फेटा देऊन पालखी सोहळा प्रमुखांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सरपंच विजयसिंह माने-देशमुख, भागवत पाटील, लालासाहेब जाधव, विजयकुमार देशमुख, धनंजय जाधव, तानाजी जाधव, प्रकाश गायकवाड, महिंद्र लोंढे, ग्रामसेवक बी. बी. कोरबु, योगेश तुपे, विजय लोंढे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
3 पालखी सोहळ्यातील लाखो वारकरी एकत्र
बोंडलेत जगद्गुरूंचा पालखी सोहळा आल्यानंतर बोंडले मुक्कामी असलेला श्री संत सोपानकाकांचा पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. यावेळी श्री संत सोपानकाकांच्या पालखीचा रथ श्री तुकोबांच्या पालखी रथा शेजारी उभा करण्यात आला. यावेळी दोन्ही संतांच्या भेटी झाल्या.
बोंडले येथे एकाचवेळी श्री संत सोपानकाका, श्री संत तुकाराम महाराज आणि माउलींच्या पालखी सोहळ्यातील लाखो वारकरी एकत्र आल्यामुळे टाळ मृदंगाच्या आणि माउली, तुकारामांच्या जयघोषामुळे आसमंत दुमदुमला होता. येथून पुढे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत सोपानकाका आणि श्री संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे एकत्र एकाच मार्गाने पुढील मुक्कामी मार्गस्थ झाले.