Vari Pandharichi 2025: भेटावया भक्तजनां। उभाची राणा पंढरीचा।।
अभंगामध्ये निळोबारायांनी देव कसा भक्तवत्सल आहे याचे वर्णन केले आहे
By : ह.भ.प अभय जगताप
सासवड :
भेटावया भक्तजनां ।
उभाची राणा पंढरीचा ।।
अवलोकितो दिशा चारी ।
येती वारकरी ज्या पंथें ।।
आलियाचा राखें मान ।
करीं समाधान यथाविधि ।।
निळा म्हणे दोषा खंड ।
चुकवी दंड यमाचा ।।
संत निळोबाराय म्हणजे तुकोबारायांचे शिष्य. वारकरी संप्रदायातील शेवटचे स्वीकृत संत. त्यांचा जन्म तुकोबांच्या वैकुंठगमनानंतर झाला तुकोबांचे अभंग वाचून, त्यांचे चरित्र ऐकून त्यांनी तुकोबांना गुरु मानले आणि त्यांच्या भेटीचा ध्यास घेतला. त्यासाठी अनुष्ठान मांडले.
या भक्तीवर प्रसन्न होईल स्वत: पांडुरंग त्यांना भेटायला आले तेव्हा मी तुझ्यासाठी नाही तर तुकोबांसाठी अनुष्ठान करत आहे, असे महाराजांनी सांगितले. त्यानंतर त्यांना तुकोबारायांचे दर्शन झाले, अशी कथा आहे. पण याचा अर्थ त्यांना देव नको होत असे नाही. तर त्यावेळेस त्यांना तुकोबांच्या भेटीची ओढ होती. त्यांनी सुद्धा पंढरी वर्णन, विठ्ठल वर्णन आणि वारी वर्णनाचे अभंग लिहिलेत.
या अभंगामध्ये निळोबारायांनी देव कसा भक्तवत्सल आहे याचे वर्णन केले आहे. ‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गुज देवराय’ असा देवाचा निरोप नामदेवरायांनी एका अभंगात दिला आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उतावीळ।। असे देवाचे वर्णन तुकोबारायांनी सुद्धा केले आहे.
वारकरी संप्रदायाला अभिप्रेत देव भक्ताचे जे नाते आहे, त्यामध्ये देवाला सुद्धा भक्ताची गरज आहे. मुलांना जसा आईवडिलांना बघून आनंद होतो तसेच आई वडिलांनाही मुलांना भेटण्याची ओढ असते. निळोबारायांनी सुद्धा या अभंगांमध्ये तोच भाव व्यक्त केला आहे.
पंढरपूरला देव उभा आहे तोच मुळात भक्तांना भेटण्यासाठी. त्यामुळे तो उभा राहून भक्तांची वाट पाहतो. हीच बाब लक्षात घेवून आषाढी वारीमध्ये भक्तांना अहोरात्र दर्शन देण्यासाठी देवाचे निद्रा, शेजारती इत्यादी उपचार बंद केले जातात. चहुदिशांनी वारकरी पंढरपूरला येतात. म्हणून तो चारी दिशांना बघतो आहे.
भक्तांना भेट देऊन तो त्यांचा मान राखतो. ‘पुसता सांगेन हितगुज मात’ असे तुकोबांनी म्हटले आहे. तुकोबांसारखे भक्त देवाला आपले मनोगत सांगतात यात नवल नाही पण सामान्य भक्त सुद्धा देवापाशी आपले मन मोकळे करतात. पूर्वी आषाढी, कार्तिकी वारीमध्ये देवाच्या दक्षिणापेटीत पैशांबरोबर भाविकांच्या चिठ्ठ्या सापडत.
या चिठ्ठ्यांमध्ये सासुरवाशीणी सासूरवासाचे आणि पुरुष आपल्या भावकीच्या त्रासाचे दु:ख लिहीत असल्याचा उल्लेख साने गुरुजींनी केला आहे. वारी ही इतर अन्य लाभासाठी नसली तरी सुद्धा पांडुरंग आपल्या भक्तांचे सर्व दोष हरण करून त्यांची यमपाशातूनही सुटका करतो.