Vari Pandharichi 2025: जनी म्हणे विठोबाला। काय उतराई होऊ तुला।।, दळिता कांडिता तुज गाईन अनंता
परभणी जिह्यातील गोदावरी तीरावरील गंगाखेड गावी जनाबाईचा जन्म झाला
By : मीरा उत्पात
ताशी : संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या भागवत धर्मात समाजातील सर्व थरातील जन सामील झाले. यात उच्च नीच, गरीब, श्रीमंत, वय, जात, लिंग असा कोणताच भेदभाव नव्हता. या काळातील एक समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणजे संत जनाबाई. परभणी जिह्यातील गोदावरी तीरावर असलेल्या गंगाखेड या गावी जनाबाईचा जन्म झाला.
तिच्या आई वडिलांचे नाव दमा आणि करूंड असे होते. ते विठ्ठल भक्त होते. नियमित वारी करीत होते. लग्न होऊन खूप दिवस झाले तरी उभयतांना मूलबाळ झाले नाही म्हणून ते उदास असत. एकदा पंढरपुरात आल्यावर जनाबाईची आई करुंड हिला स्वप्नात विठ्ठलाचा दृष्टांत झाला की तिला मूल होईल पण होणारे मूल मला म्हणजे विठ्ठलाला अर्पण करावे लागेल.
तिने हे कबूल केले. खूप दिवसांनी आपल्याला अपत्य जन्माचा आनंद मिळणार म्हणून करूंडला खूप आनंद झाला. यथावकाश त्यांना जना ही मुलगी झाली. अतिशय हुशार, गोड मुलीच्या बाळलीलांनी घर आनंदून गेले. म्हणतात ना की सुखाचे दिवस भरभर जातात. जना जसजशी मोठी होऊ लागली, तसतसे दमा आणि करूंडला तिला विठ्ठलाला अर्पण करावे लागणार, हा विचार दु:ख देत होता.
जना सहा वर्षांची झाल्यावर विठ्ठलानेच तिला पंढरपूरला नामदेवांच्या घरी आणून सोडण्यास सांगितले. त्यामुळे दमा आणि करूंड यांनी जनीला नामदेवांचे वडील दामाशेट यांच्या स्वाधीन केले. तेव्हापासून ती नामदेवांच्या कुटुंबाची भाग बनली. तिने आयुष्यभर स्वत:ला नामयाची दासी म्हणवून घेतले.
नामदेवांच्या सहवासात तिला विठ्ठलभक्तीची गोडी लागली. नामदेव हेच तिचे गुरू झाले. त्यामुळे तिच्या आयुष्याला पारमार्थिक वळण लागले. संत ज्ञानेश्वरांच्या मांदियाळीतील सर्व संतांचा सहवास तिला मिळाला. त्यामुळे आधीच प्रतिभावंत असलेल्या जनाबाईंचे अभंग भक्तीच्या तेजस प्रकाशाने अधिकच उजळून निघाले.
विठू माझा लेकुरवाळा संगे संतांचा मेळा या तिच्या प्रसिद्ध अभंगात तिने तिला सहवास लाभलेल्या संतांचे वर्णन केले आहे. तिने शास्त्र पुराणांचा अभ्यास केला नव्हता. केवळ नामसाधना करून विठ्ठलाला अंकित केले होते. हृदयी बंदिखाना केला, आत विठ्ठल कोंडियेला। हे तिचे साधना सामर्थ्य होते. या सामर्थ्याने ती विठ्ठलाला निर्भीडपणे खडे बोल सुनावते. आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला। असे आपले हृदगतही ती विठ्ठलाला सांगते. विठ्ठल जनीच्या सतत मागेपुढे करत असे.
झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी।
पार्टी घेऊन या शिरी। नेऊनिया टाकी दुरी।
ऐसा भक्तिसी भुलला। नीचकामे करू लागला।
जनी म्हणे विठोबाला। काय उतराई होऊ तुला।।
विठ्ठल जनीला तिच्या प्रत्येक कामात मदत असे. नित्यकर्म करताना तर ती सतत विठ्ठल नामाचा जप करत असे. एवढेच काय पाऊल उचलताना सुद्धा नाम विठोबाचे घ्यावे। मग पाऊल टाकावे।। असे ती म्हणते. दळिता कांडिता तुज गाईन अनंता। हे तिचे तत्वज्ञान आहे.
तिने आपल्या अभंगातून तत्कालीन संतांचे वर्णन केले आहे म्हणून आपल्याला त्या त्या संतांच्या जीवनाचे आकलन होते. विठ्ठलाला निर्भीडपणे प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य बाळगणाऱ्या, गुरूची सावली बनून राहिलेल्या जनाबाईने विठू रायाच्या भेटीला येणाऱ्या भक्तांची धूळ सदोदित आपल्या माथ्यावर पडावी या हेतूने संत नामदेवांच्या कुटुंबाबरोबर आषाढ वद्य त्रयोदशीला मंदिराच्या पहिल्या पायरीवर समाधी घेतली. ते ठिकाण नामदेव पायरी म्हणून ओळखले जाते.