संत मीरा-हेरवाडकर आज अंतिम लढत
मुलींच्या विभागात झेवियर्सची जेतेपदासाठी लढत जोसेफ संतिबस्तवाडशी
बेळगाव : पोलाईट वर्ल्ड वाईड संघटना व सेंट पॉल्स स्कूल आयोजित 57 व्या फादर एडी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य सामन्यातून संत मीराने सेंट पॉल्सचा तर हेरवाडकरने सेंट झेवियर्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. निशा छाब्रिया चषक महिलांच्या विभागातील स्पर्धेत सेंट जोसेफ संतिबस्तवाड ‘अ’ने सेंट जोसेफचा तर सेंट झेवियर्सने सेंट जोसेफ ब संतिबस्तवाडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सेंट पॉल्स पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावरती झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या मुलांच्या गटात एम. व्ही. हेरवाडकरने सेंट झेवियर्सचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात पहिल्या सत्रात 16 व्या मिनिटाला हेरवाडकरच्या अथर्व नाकाडीने मारलेला फटका गोलपोस्ट लागून बाहेर गेला.
22 व्या मिनिटाला झेवियर्सच्या महाद बी. ने गोल करण्याची संधी दवडल्याने पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 38 व्या मिनिटाला हेरवाडकरच्या अथर्व सोमन्नाचेने मारलेला फटका झेवियर्सचे गोलरक्षक उझेरने उत्कृष्ट अडविला. निर्धारीत वेळेत गोलफलक कोराच राहिल्याने पंचांनी जादा वेळेचा अवलंब केला. त्यातही गोल कोंडी कायम राहिल्याने अखेर टायब्रेकरचा वापर केला आणि टायब्रेकरमध्ये हेरवाडकरने 3-2 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. हेरवाडकरतर्फे रितेश कदम, श्रेयस हैबत्ती, अथर्व सोमन्नाचे यांनी गोल केले तर झेवियर्सतर्फे महमद माहिद बी, रेहान यश यांनी गोल केले.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गतविजेत्या सेंट पॉल्सने संत मीराचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव केला. या सामन्यात 14 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या श्रेयस तरळेने मारलेला वेगवान फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. 15 व्या मिनिटाला संत मीराच्या समर्थ पनराई याने गोल करण्याची नामी संधी दवडली. त्यामुळे पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 33 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या शेवॉन जोसेफच्या पासवर योगेश नंदीने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 39 व्या मिनिटाला संत मीराच्या समर्थने दिलेल्या पासवर रक्षित गोरूंदाने बरोबरीचा गोल करून सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण अपयशी ठरले. त्यावेळी पंचांनी जादा वेळ नियमाचा वापर केला. पण त्यातही गोलकोंडी कायम राहिली. पंचांनी दिलेल्या टायब्रेकरमध्ये दोन्ही संघाचे गोलफलक समान राहिले.
सेंट पॉल्सतर्फे आराध्य नाकाडी, सादिक मलिक, हर्षद रेवणकर, सुमीत गोणकर यांनी गोल केले. तर संत मीरातर्फे समर्थ पानारी, ओम गोमी, गौरव सुतार, गौतम रत्नाकर यांनी गोल केले. तर सडनडेथमध्ये संत मीरातर्फे रक्षित रामगौडा व जीवदान पावशे यांनी गोल केले तर सेंट पॉल्सतर्फे शेवॉन जोसेफ यांनी गोल केले. निशा छाब्रिया चषक मुलींच्या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत सेंट झेवियर्सने सेंट जोसेफ संतिबस्तवाड ब संघाचा 6-0 असा पराभव केला. या सामन्यात 5 व्या मिनिटाला साक्षी सी.ने, 8 व्या मिनिटाला वसुंधराने दुसरा गोल, 23 व्या मिनिटाला साक्षीने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 26 व्या मिनिटाला किंजलने 28 व्या मिनिटाला श्रावणीने तर 29 व्या मिनिटाला वसुंधराने असे तीन गोल केले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट जोसेफ संतिबस्तवाड अ ने सेंट जोसेफ कॉन्व्हेंटचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. त्यामुळे पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये सेंट जोसेफ संतिबस्तवाडने 3-1 असा पराभव केला. संतिबस्तवाडतर्फे राजेश्वरी कानाकेरी, मेघा कोडती, ऐश्वर्या नाईक यांनी गोल केले. तर जोसेफतर्फे गौतमी जाधवने गोल केला..
शुक्रवारी अंतिम सामना
संत मीरा विरुद्ध एम. व्ही. हेरवाडकर यांच्यात खेळविला जाणार असून मुलींच्या विभागात अंतिम सामना सेंट झेवियर्स विरुद्ध सेंट जोसेफ संतिबस्तवाड यांच्यात 3.30 वाजता खेळविला जाणार असून त्यानंतर बक्षिस वितरण समारंभ होईल