Vari Pandharichi 2025: त्रिभुवनामाजी पंढरी थोर। तेथील सेठ्या पुंडलिक भला रे ।।, कुपवाड कौलनामा
पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या ओवरीत त्यांना विठ्ठल दर्शन झाले.
By : ह. भ.प. अभय जगताप
सासवड :
त्रिभुवनामाजी पंढरी थोर ।
तेथील सेठ्या पुंडलिक भला रे ।।
पतित पावन जडमूढ भारी ।
तयास कौल दिल्हा रे ।।
निंदक दुर्जन कंटक भारी ।
कौल नाही तयाला रे ।।
अनंत कोटी पुण्य जयांचे ।
तोचि ये पेठेसी आले रे ।।
नामाचे भरित भरितो भला ।
अभागी चुकला करंटा रे ।।
बोधला म्हणे कैवल्य आले ।
दुकान तेथे बोधला रे ।।
संत माणकोजी बोधले महाराजांनी अभंगांमध्ये पंढरीवर्णन वेगळ्या पद्धतीने केले आहे. माणकोजी बोधले हे संत 17व्या शतकात बार्शी तालुक्यातील धामणगाव येथे होऊन गेले. पूर्वायुष्यात त्यांनी गावची पाटीलकी सांभाळत तलवारही गाजवली होती. पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या ओवरीत त्यांना विठ्ठल दर्शन झाले.
त्या ओवरीमध्ये त्यांची प्रतिक समाधी आहे. आषाढी कार्तिकीला धामणगावलाच मोठी यात्रा भरते. बोधले बुवांनी गावचा कारभार बघत असताना त्यांचा ज्या संज्ञेशी- शब्दाशी संबंध आला होता, त्याचा या अभंगात वापर केला आहे. कौल या शब्दाचे अनेक अर्थ होतात त्यापैकी इथे अभिप्रेत अर्थ म्हणजे वचन अथवा कबूलनामा.
पूर्वी राजे अथवा सरकारी अधिकारी लोक काही काम करून घेण्यासाठी इतर मंडळींना कौल देत म्हणजे वचन देत. गावातील एखाद्या व्यक्तीला सरकारी अथवा इतर लोकांकडून त्रास होत असेल तर त्याला सरकारकडून कौलनामा म्हणजे अभयपत्र दिले जाई.
शिवाजी महाराजांनी आणि इतर राजकीय व्यक्तींनी दिलेले अनेक कौलनामे इतिहासात प्रसिद्ध आहेत. माणकोजी महाराजांनी सुद्धा हेच रूपक पंढरी वर्णनासाठी वापरले आहे. पुंडलिकाच्या भक्तीसाठी देव पंढरपूरला आले आणि येथेच देवाने राहून भक्तांचा उद्धार करावा, असा वर पुंडलिकाने मागितला.
याचे रूपकात्मक वर्णन करताना माणकोजी महाराज म्हणतात, त्रिभुवनामध्ये पंढरपूर श्रेष्ठ आहे. या बाजारपेठेचा प्रमुख पुंडलिक शेठ आहे. तुकोबांनी सुद्धा एका अभंगात ‘पुंडलिक पाटील केली कुळवाडी’ असा रूपकात्मक उल्लेख केला आहे. जे पतीत आहेत, जड आहेत, मूढ आहेत, त्या सर्वांना इथे कोणतीही भीती नाही.
त्यांना अभय दिले आहे. त्यांनी इथे यायला, दुकान लावायला हरकत नाही. पण जे दुर्जन आहेत, कंटक म्हणजे इतरांना त्रास देणारे आहेत, इतरांची निंदा करणारे आहेत त्यांना मात्र कौल नाही म्हणजे त्यांना इथे अभय नाही. वारकरी संतांनी नामस्मरण, वारी याचा अपार महिमा गायला आहे. हे सर्व करताना सदाचरणाचे पथ्य पाळण्याचा आग्रहही धरला आहे.
त्यामुळेच माणकोजी महाराजांनी येथे दुर्जन, कंटकांना थारा नसल्याचे स्पष्ट केले आहे. जे खूप पुण्यवान आहेत, त्यांनाच इथे येण्याची इच्छा झाली आहे. माणकोजी महाराजांनी सुद्धा या पेठेत दुकान मांडले आहे. अर्थात ते या सोहळ्यात सामील झालेत.