Vari Pandharichi 2025: तिष्ठे भावभक्ती देखोनिया, संत कुरमादास यांची अखंड विठ्ठलभक्ती
विठ्ठल देखील तितक्याच उत्कटतेने आपल्या भक्तांची वाट पाहत असतो.
By : मीरा उत्पात
ताशी : संतांची चरित्रे आपल्याला जीवनाचे सर्वांग दर्शन घडवतात. सगळ्या संतांना, भक्तांना ज्या सावळ्या विठ्ठलाची ओढ लागली आहे. तो विठ्ठल देखील तितक्याच उत्कटतेने आपल्या भक्तांची वाट पाहत असतो. अखिल त्र्यैलोक्यात विठ्ठला सारखा देव नाही. विठ्ठल संत जीवनातील जीवीचे जीवन आहे. विठ्ठल फक्त भावभक्तीचा भुकेला आहे.
आपल्या भक्तांसाठी तो स्वत:ला शिणवतो. म्हणून सारे भक्त विठ्ठलासाठी वेडे होतात. अशाच एका वेड्या भक्तांपैकी एक म्हणजे संत कुर्मदास. कूर्मदास हे ज्ञानेश्वर, नामदेव यांचे समकालीन होते. एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज ज्या पैठण गावात राहत होते तिथेच कुर्मदासही रहात होते. त्यांना जन्मत: कोपरापासून हात आणि मांडीपासून पाय नव्हते.
असा मुलगा जन्माला आला म्हणून त्याचे वडील दु:खी झाले आणि त्यांनी प्राण त्यागले. या अपंगत्वामुळे कुर्मदासांना स्वत:ची दैनंदिन कार्ये करता येत नव्हती. त्यांची आई त्यांचे सर्वकाही करत असे. आईच्या पाठकुळी बसून ते सर्वत्र हिंडत असत. अपंग असले तरी कुर्मदासांची बुद्धी तल्लख होती. विठ्ठलाप्रती अनन्यसाधारण भक्ती होती. भानुदास महाराज गोदावरी तीरी वाळवंटात कीर्तन करत असत तेव्हा त्यांनी म्हटलेली पदे अभंग सारे काही कुर्मदासाला मुखोद्गत होते.
भानुदास महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी ते लोळत लोटांगण घेत पुढे जाऊन बसत असत. एकदा आषाढी वारी जवळ आली होती. भानुदास महाराजांनी कीर्तनातून आषाढी वारीचे आणि विठ्ठलाचे वर्णन केले. त्यामुळे कुर्मदासांना विठ्ठल भेटीची ओढ लागली. पैठणहून महाराजांसह सारे जण वारीसाठी पंढरीला निघाल्यावर कुर्मदासांनी पंढरपूरला वारीला जायचा निश्चय केला. महाराज म्हणाले, अरे इथे तुला रोज आई घेऊन येते.
तिला एवढ्या लांब तुला पाठकुळी घेऊन येणे शक्य होणार नाही. परंतु, कुर्मदासांचा निश्चय दृढ होता. ते म्हणाले, महाराज तुम्ही नुसतं हो म्हणा, बाकीचं माझे मी बघता, महाराजांनी नाईलाजाने होकार दिला. कुर्मदासांनी वारीचा पहिला मुक्काम विचारून घेतला. रात्री उठून त्या गावाकडे निघाले. पहाटे मुक्कामी पोहोचल्यावर वारीची दिंडी येणार आहे, असे गावातील लोकांना सांगून त्यांच्याकडून भाजी भाकरीची व्यवस्था केली.
दिंडी मुक्कामाच्या गावी आल्यावर महाराजांनी पाहिले तर कुर्मदास तिथे आधीच पोचलेत आणि सगळ्या दिंडीसाठी त्यांनी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. महाराजांना आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. मग संपूर्ण वारीच्या प्रवासात कुर्मदास रात्री निघत पहाटे मुक्कामी पोहोचत आणि दिंडीसाठी भोजनाची व्यवस्था करत. असे करत करत ते अगदी वारीच्या शेवटच्या टप्प्यात आले. कुर्डुवाडी जवळच्या लऊळ गावी शेवटचा मुक्काम होता.
महाराज त्याच्या जवळ आले आणि म्हणाले, कुर्मदासा आता फक्त शेवटचा टप्पा राहिला आहे. पण कुर्मदास म्हणाले ”महाराज तुम्ही पंढरपूरला पुढे जावा आणि पांडुरंगाला माझा निरोप सांगा. तुझे दर्शन माझ्या नशीबात नाही. मी काही आता पंढरपूर पर्यंत येऊ शकत नाही, असे म्हटल्यानंतर महाराजांनी पालथ्या झोपलेल्या कुर्मदासांना उलटे केले आणि पाहिले तर काय त्याचे पोट सोलवटून निघालं होतं. असंख्य जखमा झाल्या होत्या.
काटे, खडे रुतलेले होते. घरून निघाल्या पासून पोटात अन्नाचा कण नसल्याने अंगात त्राण नव्हते. सगळ्या दिंडीसाठी अन्न गोळा करून जेवू घालणारा कुर्मदास स्वत: मात्र उपाशी राहिला होता. महाराजांनी कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले, घरी माझी आई माझं मलमूत्र काढत होती आता इथे कोण काढणार? म्हणून मी अन्न सेवन केले नाही.
महाराजांना अतिशय वाईट वाटले. ते जड अंत:करणाने कुर्मदासाचा निरोप घेऊन पंढरपूरला आले. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनाला आले. डबडबलेल्या डोळ्यांनी विठोबाचे दर्शन घेताना त्यांनी फक्त विठोबाकडे पाहिले. विठोबाला भानुदासाच्या अंत:करणातील कुर्मदासाचा निरोप पोहोचला.
रुक्मिणीला विठ्ठलाने सांगितले तू आता वारी सांभाळ, मी निघालो माझ्या भक्ताकडे. विठ्ठल क्षणात लऊळला आला. तिथे कुर्मदास विठ्ठलाची आर्ततेनं वाट पहात होते. त्यांचे भान हरपले होते. कुर्मदासांनी अचानक तेजस्वी प्रकाश पाहिला. डोळे उघडून पाहिले तर साक्षात परमात्मा पांडुरंग त्याच्या समोर उभा होता.
पांडुरंगाने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. देव म्हणाला, तुला काय हवे? कुर्मदास म्हणाल, देवा माझे केवढे भाग्य तू स्वत: माझ्यासाठी इथे आलास. मला काही नको. जन्मोजन्मी मला तुझी भेट घडवून देणारा सद्गुरू भेटो, असे म्हणत कुर्मदासांनी विठ्ठलाच्या मांडीवर प्राण सोडले. कुर्मदासांनी विठ्ठलाला भानुदास महाराजांनी कीर्तनात वर्णिलेली चंद्रभागा मला पाहायची होती, असे म्हटल्यामुळे विठ्ठलाने तिथे एक खड्डा करून पंढरपूरची चंद्रभागा आणली.