Vari Pandharichi 2025: जनी म्हणे गोपाळा। करी भक्तांचा सोहळा।।
जनाबाईंनी देवाचे वर्णन करताना त्याला लेकुरवाळा असे म्हटले आहे
By : ह.भ.प अभय जगताप
सासवड : विठो माझा लेकुरवाळा । संगें लेकुरांचा मेळा ।। निवृत्ति हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ।। पुढें चाले ज्ञानेश्वर । मागें मुक्ताई सुंदर ।। गोरा कुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ।। वंका कडियेवरी । नामा करांगुळीं धरी ।। जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ।।
संत जनाबाई म्हणजे संत नामदेवरायांच्या घरच्या दासी. त्या नामदेवरायांसारख्या संतांच्या सहवासात आल्या आणि संतपदाला पोचल्या. नामदेवरायांच्या घरातले चौदाजण आणि पंधराव्या दासी जनाबाई, हे सर्व विठ्ठल भक्त होते. शिवाय यातील बहुतेकांनी अभंगरचना केली आहे.
या अभंगात जनाबाईंनी देवाचे वर्णन करताना त्याला लेकुरवाळा असे म्हटले आहे. सर्व संत हे पांडुरंगाची लेकरं आहेत आणि तो त्यांना घेऊन चालला आहे. संत निवृत्तीनाथांना खांद्यावर घेतले आहे तर सोपान देवांना हाताला धरले आहे. ज्ञानेश्वर माउली पुढे चालत आहेत आणि मुक्ताबाई देवाच्या मागे चालत आहे.
गोरोबा काकांना मांडीवर घेतले आहे तर चोखोबांना हृदयाशी धरले आहे. बंकांना कडेवर घेतले आहे तर नामदेवांचे बोट धरले आहे. अशाप्रकारे जनाबाई म्हणतात की, देव भक्तांचा सोहळा करतो आहे. भानुदास महाराज, कानोपात्रा, एकनाथ महाराज, तुकोबाराय, निळोबाराय, बहिणाबाई, माणकोजी बोधले हे उत्तरकालीन संत असल्यामुळे त्यांचा उल्लेख या अभंगात नसणे स्वाभाविक आहे.
‘उंच नीच काही नेणे भगवंत’ या तुकोबांच्या अभंगात इतर अनेक संतांचा उल्लेख आला आहे. त्यामध्ये देव भक्तांसाठी कसा राबतो, याचे वर्णन आहे. तो सावता माळ्यांना खुरपू लागतो, कबीरांना हातमागावर शेले विणू लागतो, नरहरी सोनारांना घडू फुंकू लागतो, सजन कसायांना मांस विकू लागतो.
चोखोबांच्या बरोबर मेलेली ढोरे ओढतो, धर्मराजाच्या यज्ञामध्ये पाणी भरतो, झाडून काढतो, ज्ञानेश्वरांची भिंत ओढतो, कृष्णावतारामध्ये नंदाच्या घरी गाई वळतो, मीराबाईसाठी त्यांच्या वाट्याला आलेले विष प्राशन करतो, नरसी मेहत्याची हुंडी भरतो, असे अनेक उल्लेख आहेत.
नाथांच्या घरी देवाने श्रीखंड्याच्या रूपाने पाणी भरणे वगैरे सेवा केली होती. जनाबाईंच्या बरोबर देवाने शेणी म्हणजे गवऱ्या वेचल्या होत्या. तुकोबांच्या पत्नी जिजाबाई यांच्या पायात काटा रुतला तेव्हा देवाने गवळ्याचे रूप घेऊन तो काटा काढला. वारकरी संतांनी अशाप्रकारे भक्तवत्सल देव वर्णन केला आहे. सर्व संत, भक्त देवाची लेकरं आहेत. आई जशी आपल्या मुलांना कामात मदत करते, तसा देवही त्यांना त्यांच्या कामात मदत करत असतो.