Vari Pandharichi 2025: निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे
आठव्या मुलाला जिवंत केले पण स्वर्गात जाण्यापासून रोखले
By : मीरा उत्पात
ताशी : ज्ञानेश्वरकालीन संतांमधील ज्येष्ठ नाव म्हणजे संत गोरा कुंभार! धाराशिव जिह्यातील तेरणा नदीच्या तीरावर असलेले तेर हे गोरा कुंभार यांचे गाव. ते निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, नामदेवादी संतांमध्ये ज्येष्ठ होते. सारेजण त्यांना गोरोबाकाका म्हणून संबोधत. गोरोबाकाकांचे वडील माधवबुवा आणि आई रूक्माबाई यांची आठ अपत्ये जन्मत: मृत्यू पावली.
माधवबुवा आणि रूक्माबाई खूप दु:खी झाले. आठवा मुलगा गेल्यावर त्यांनी विठ्ठलाची अंत:करणापासून प्रार्थना केली. विठ्ठल प्रसन्न झाले. विठ्ठलाने माधवबुवांची सात मुले जिवंत करून त्यांना स्वर्गात पाठवले. आठव्या मुलाला जिवंत केले पण स्वर्गात जाण्यापासून रोखले. तो मुलगा म्हणजे गोरोबा! गोरीतून पुनर्जन्म झाला म्हणून त्याचे नाव गोरा ठेवले.
अगदी लहान वयातच ते भक्तिमार्गाला लागले. गोरोबांना नाथपंथीय गुरू रेवणनाथ यांची दीक्षा मिळाली. नाथपंथीय निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे ते सुद्धा विठ्ठलाच्या भक्तीत रममाण झाले. गोरोबा आपले कुंभार काम करत असताना सतत पांडुरंगाचे नाम घेत असत. भजनामध्ये तल्लीन होत असत. एकदा त्यांची पत्नी संती आपल्या रांगणाऱ्या मुलाला अंगणात ठेवून पाणी आणायला गेली.
तिने जाताना गोरोबांना मुलाकडे लक्ष ठेवायला सांगितलं. त्यावेळी अंगणात गोरोबा माती तुडवत होते. नामसंकीर्तनात ते इतके तल्लीन झाले की त्यांचे रांगणारे बाळ त्यांच्याजवळ आले आणि मातीच्या आळ्यात पडले हे त्यांना कळाले नाही. गोरोबांनी माती बरोबर त्या बाळालाहा तडुवल.. संती पाणी भरून आल्यावर तिने हा सगळा प्रकार पाहिला.
तिला गोरोबांचा खूप राग आला ती त्यांना आणि विठ्ठलाला अपशब्द वापरू लागली. त्यामुळे गोरोबांना खूप राग आला. ते हातातील चिपळ्या फेकून संतीला मारणार तेवढ्यात तिने ‘माझ्या अंगाला हात लावाल तर विठ्ठलाची शपथ आहे’ असे म्हटले. विठ्ठलाची शपथ घातल्यामुळे गोरोबाकाका भानावर आले. झाल्या प्रसंगाचे त्यांना खूप दु:ख झाले.
त्यानंतर त्यांनी संतीला हात लावला नाही. आपले मूल तर गेले आणि गोरोबा आपल्याशी वैराग्याने वागत आहेत, हे पाहून संतीला खूप वाईट वाटू लागले. संतीने आपल्या वडिलांना सर्व हकिकत सांगितल्यावर वडिलांनी तिची बहीण रामी हिचा विवाह गोरोबांशी करण्याचे ठरवले. हा विवाह झाल्यावर पाठवणीच्या वेळी संतीचे वडील गोरोबांना म्हणाले की ‘माझ्या रामीला संतीप्रमाणेच वागवा’. त्यांच्या तोंडून हे शब्द आल्यावर गोरोबा रामीशी पण संतीप्रमाणे वागू लागले.
त्यामुळे आपला वंश पुढे कसा चालणार, अशी चिंता संती आणि रामी दोघींना वाटू लागली. एके दिवशी त्या गोरोबाकाका गाढ झोपेत असताना त्या दोघी त्यांच्या आजूबाजूला झोपतात आणि त्यांचे दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवतात. गोरोबांना जाग आल्यावर त्यांना आपलाच खूप राग येतो. आपल्याकडून चूक घडली, असे म्हणून ते आपले दोन्ही हात छाटून घेतात.
दोन्ही हात छाटल्यामुळे त्यांचा कुंभार कामाचा व्यवसाय बसतो. तेव्हा पांडुरंग स्वत: येऊन गोरोबांची मडकी घडवतो आणि रुक्मिणी माता ती मडकी नेऊन विकते. अशा प्रकारे गोरा कुंभाराचा संसार पांडुरंग चालवतो. एकदा संत नामदेव गोरा कुंभारांना भेटायला तेर येथे येतात. त्यावेळी ते नामदेवांच्या कीर्तनात तल्लीन होतात. भावावस्थेतच ते टाळ्या वाजवण्यासाठी आपले थोटे हात वर करतात. त्याच वेळी त्यांच्या थोट्या हातांना आपोआप पंजे फुटतात.
सारेजण हा चमत्कार पाहून विठ्ठलाचा जयजयकार करतात. संती विठ्ठलाला आपले गेलेले मूल देण्याची विनंती करते. त्यावेळी तिचे गेलेले मूल रांगत रांगत येते. त्यामुळे संती, रामी आणि गोरोबांना खूप आनंद होतो. त्या क्षणापासून रामी आणि संती विठ्ठलाच्या परमभक्त होतात. आजही तेर येथे नामदेवांनी कीर्तन केलेली ती जागा दाखविली जाते.
गोरोबांची महती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर दक्षिण भारतातही आहे. तेलुगू कवी पुट्टपुर्थी नारायणाचार्यलु, जयराम यांनी तेलुगू भाषेत लिहिलेल्या संत साहित्यात गोरोबांना मानाचे स्थान दिले आहे. गोरोबांची पालखी कार्तिकी वारीला विठ्ठलाच्या भेटीला येते. तेर येथील गोरोबा काकांच्या मंदिरात पाण्यावर तरंगणारी वीट आहे. गोरोबांना तू तयार केलेली वीट पाण्यात बुडणार नाही, असे विठ्ठलाने सांगितले होते. त्यामुळे ही गोरोबा काकांनी तयार केलेली वीट आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे!