Vari Pandharichi 2025: ठाकुरबुवा समाधीस्थळी रंगले माउलींचे तिसरे गोल रिंगण, वारकऱ्यांचा आनंद गगनात
प्रत्येक दिंड्यांमधून काकडा भजनाची मालिका सुरू होती
By : विवेक राऊत
नातेपुते : उठा उठा प्रभात झाली, चिंता श्रीविठ्ठल माउली दीनजनांची साऊली, येईल धाऊनी स्मरतांची
असे अभंग गात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ठाकुरबुबांच्या समाधी नजीक तिसऱ्या गोल रिंगणासाठी गुरूवारी सकाळी 7.30 वाजता पोहचला. सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण आज ठाकुरबुवा येथे सकाळी 8 वाजता झाले. वेळापूर येथे पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते पहाटपूजा होऊन सोहळ्याने सकाळी 6 वाजता भंडीशेगावकडे प्रस्थान ठेवले.
आज ढगाळ वातावरण असल्याने वारकऱ्यांची वाटचाल आनंदात सुरू होती. प्रत्येक दिंड्यांमधून काकडा भजनाची मालिका सुरू होती. सकाळी 7.30 वाजता रिंगण स्थळी अश्वांचे आगमन झाले. चोपदार राजाभाऊ, रामभाऊ, सार्थक, वेदांत यांनी रिंगण लावून घेतले.
पालखी जवळ दिंड्यामधील पताकाधारी गोलाकार पद्धतीने उभा होते. त्यानंतर भोपळे दिंडीच्या मानाच्या जरीपटक्याने प्रदक्षिणा पूर्ण केली. स्वारांच्या आणि माउलींच्या अश्वाने दौडीस प्रारंभ केला, आज अश्वांनी रिंगणास चार पूर्ण फेऱ्या केल्याने वारकरी आनंदित झाले होते.
भंडीशेगावात मुक्काम
ठाकूर बुवा समाधी येथील रिंगणानंतर तोंडले येथे नंदाच्या ओढ्यावर माऊलींच्या पालखीचा दुपारचा विसावा झाला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव या बंधू भेटीचा सोहळा टप्पा येथे झाला. माउलींचा सोहळा भंडीशेगाव येथे तर तुकोबाराय यांची पालखी आज पिराची कुरोली येथे मुक्कामी असणार आहे.
अश्वांची दौड झाल्यानंतर रंगला उडीचा खेळ
अश्वांची दौड झाल्यानंतर चोपदारांनी दिंड्यांना उडीसाठी निमंत्रण दिले. माउलींच्या पालखीसभोवती हजारो टाळकऱ्यांनी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष सुरू केला. टाळकऱ्यांच्याभोवती मृदंगवादक, वीणेकरी गोलाकार पद्धतीने फिऊन रिंगण पूर्ण करीत होते.