Vari Pandharichi 2025: माझ्या मल्हारीची वारी, भंडारा उधळून माउलींच्या पालखीचे स्वागत
रिमझिम पाऊस अशा ऊर्जादायी वातावरणात सोहळा पुढे सरकू लागला
पुणे :
वारी हो वारी । देई कां मल्हारी ।।
त्रिपुरारी हरी । तुझे वारीचा मी भिकारी ।।
ही आर्तता, टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा-येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष...अन् भंडारा आणि खोबऱ्याची मुक्त उधळण... अशा भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे खंडेरायाच्या जेजुरीत मंगळवारी जोरदार स्वागत करण्यात आले. तर संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी वरवंडमध्ये भक्तीचा जणू महापूरच लोटला.
माउलींच्या पालखीचा दोन दिवस सासवडमध्ये मुक्काम होता. सासवडकरांच्या प्रेमळ पाहुणचारानंतर पालखी सोहळा मंगळवारी भल्या सकाळी मार्गस्थ झाला. हरिनामाच्या गजरात वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले. ऊन, सावली अन् रिमझिम पाऊस अशा ऊर्जादायी वातावरणात सोहळा पुढे सरकू लागला.
बोरावके मळा येथे पालखीचा पहिला विसावा झाला. तेथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. त्यानंतर पालखी रथ पुन्हा मार्गक्रमण करू लागला. यमाई शिवरी येथे दुपारचा विसावा झाला. तर साकुर्डेत तिसरा विसावा झाल्यावर पालखी जेजुरीच्या दिशेने निघाली. वारकरी संप्रदायात जेजुरीच्या मुक्कामाला विशेष महत्त्व आहे.
पालखी सासवडहून निघाली की वारकऱ्यांना वेध लागतात, ते या सोन्याच्या जेजुरीचे. कारण खंडेरायाशी वारकऱ्यांचे जुने नाते आहे. त्यामुळे जेजुरीचा गड नजिक येताच टाळ, मृदंग घणघणू लागले. अभंगाचे सूर सर्वदूर गुंजू लागले. पालखी जेजुरीत पोहोचली नि जेजुरीकरांच्या आनंदालाही पारावार राहिला नाही.
भंडारा आणि खोबरे उधळून पालखीचे स्वागत करण्यात आले. जेजुरीकरांच्या या स्वागताने पालखी भंडाऱ्यात न्हाऊन निघाली. सायंकाळी सोनपावलांचे ठसे उमटवत पालखी जेजुरी मुक्कामी विसावली. माउलींची पालखी आज वाल्ह्यात, तर तुकोबांची उंडवडी गवळ्याचीमध्ये. संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा प्रवास पंढरीच्या दिशेने सुरू आहे.
बुधवारी माउलींची पालखी वाल्हे मुक्कामी दाखल होईल. तर तुकोबांची पालखी उंडवडी गवळ्याची येथे पोहोचेल. वरवंड ते उंडवडी गवळ्याची हा मोठा म्हणजे, 34 किलोमीटरचा टप्पा आहे. अभंगाच्या तालावर डोलत, नाचत संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी वरवंडी मुक्कामी पोहोचला. सोमवारी तुकोबांच्या पालखीचा यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिरात मुक्काम होता.
तुकोबांच्या पादुकांच्या दर्शनासाठी यवतकरांनी रात्री मोठी गर्दी केली होती. मंगळवारी सकाळी तुकोबारायांच्या पादुकांची महापूजा आणि काकड आरती झाली. यवत ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेत ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर पालखी रथात ठेवण्यात आली. यवतकरांनी पालखीला भावपूर्ण निरोप दिला. त्यानंतर सोहळा पुन्हा पंढरीच्या वाटेला लागला.
मजल-दरमजल करीत वैष्णवांचा हा मेळा पुढे सरकू लागला. पालखीच्या दर्शनासाठी राहू बेट, पारगाव आणि शिऊर तालुक्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक वेशभूषा करून लहान मुलेही सोहळ्यात सहभागी झाली होती. सकाळी दहा वाजता पालखी भांडगाव येथे विसाव्यासाठी थांबली.
तेथे भाविकांनी रांगा लावून तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखी रथ पुन्हा मार्गस्थ झाला. सायंकाळी पालखी वरवंड मुक्कामी दाखल झाली. पालखीच्या आगमनाने वरवंडवासियांना आकाश ठेंगणे झाले. पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.