Vari Pandharichi 2025: देव गुज सांगे पंढरीसी यारे । सोलापूर जिल्ह्यात माउलींचे जल्लोषी स्वागत
पालखी सोहळ्याने सोमवारी सकाळी 10 वाजता सोलापूर जिह्यात प्रवेश केला
By : विवेक राऊत
नातेपुते : देव गुज सांगे पंढरीसी यारे । प्रेमें चित्तीं घ्यारे नाम माझें ।। कायावाचामनें दृढ धरा जीवीं । सर्व मी चालवी भार त्यांचा ।।
असे विठ्ठल-वारकरी प्रेमांचे आर्त प्रगट करणारे दिंड्यांमधून गायले जाणारे अभंग... डौलाने फडकणाऱ्या पताका...रथाला डोळ्यांचे पारणे फेडणारी केलेली आकर्षक फुलांची सजावट...माउली माउली नामांचा अखंड जयघोष सुरू होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या शाही सोहळ्याचे सोलापूर जिह्यात स्वागत झाले. पालखी सोहळ्याने सोमवारी सकाळी 10 वाजता सोलापूर जिह्यात प्रवेश केला.
विठुरायाच्या कुशीत आल्याची भावना वैष्णवांनी व्यक्त केली. लापूर जिल्ह्यात स्वागतासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, सौ. गोरे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार उत्तमराव जानकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार राम सातपुते, अॅड. रामहरी रुपनवर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक जंगम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ आदीसह हजारो नागरिक उपस्थित होते.
सकाळपासूनच हजारो वारकरी जिह्यात प्रवेश करीत होते. सकाळी 9.30 वाजता माउलींच्या नगाऱ्यांचे पाठोपाठ माउलींच्या आणि स्वारांच्या अश्वांचे आगमन झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दिंड्यांपाठोपाठ 10 वाजता माउलींच्या रथाचे आगमन झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माउलींचे पूजन करून स्वागत केले. यावेळी पालखी सोहळ्याचे
मालक बाळासाहेब आरफळकर, विश्वस्त, राजाभाऊ, रामभाऊ, बाळासाहेब यांचा सन्मान करण्यात आला. सातारा जिल्हा समारोपास जिल्हाधिकारी आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी 8.30 पासून माउलींच्या आगमनापर्यंत 10 जिह्यांतील 11 कलापथकांनी पंढरीच्या दारी स्वच्छतेची वारी हा संदेश घेऊन मान्यवरांच्या समोर कला सादर केली.
यामध्ये चंदाताई तिवाडी, शिवशाहीर देवानंद माळी, दिलीप तुपसुंदर आदींनी कला सादर केली. या पथकात एकूण 70 कलाकार आहेत. पुणे आणि सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विद्यार्थी मंडळ 2004 पासून सोहळ्यात प्रबोधन करतात.
माउलींच्या सोहळ्यात यावर्षी सुमारे पाच लाख ऐवढा समाज असल्याचा अंदाज चोपदार रामभाऊ चोपदार यांनी व्यक्त केला. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठी गर्दी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पालखी मार्गावर चरणसेवा हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे. पालखीचा सोमवारचा मुक्काम नातेपुते येथे आहे.