Vari Pandharichi 2025: लाखो वैष्णवांच्या मेळ्याला सातारा जिल्ह्याचा निरोप
संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्याचा निरोप घेतला
By : रमेश आढाव
फलटण :
अवघाचि संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिन्हीं लोक ।।
जाईन गे माय तया पंढरपुरा।
भेटेन माहेरा आपुलिया ।।
अंभगवाणीप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेला संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्याचा निरोप घेतला. लाखो वैष्णव सागरासह फलटण तालुका आणि सातारा जिह्यातील अखेरचा मुक्काम आटोपून सोमवारी बरड पालखी तळावरून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.
हरिनामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा गजर आणि आनंद व्यक्त करीत विठ्ठलाकडे निघालेला माउलींचा पालखी सोहळा बरड गावकऱ्यांचा निरोप घेत सोलापूर जिह्यातील प्रवेशाच्या दिशेने मार्गस्थ झाला. दरम्यान, बरड आणि परिसरातील युवक, आबालवृद्ध, महिला, पुरूष अशा हजारो माउली भक्तांसह फलटण पूर्व भागातील विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी रथातील माउलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याला निरोप दिला.
पालखी सोहळा राजुरी गावच्या हद्दीतील साधू बुवा मंदिर परिसरात विसाव्यासाठी थांबविण्यात आला. या ठिकाणी पालखी सोहळा थांबविण्यात येत असल्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी प्रंचड गर्दी केली होती.
साताऱ्याचा निरोप, सोलापुरात स्वागत
साधू बुवा मंदिर परिसरातील विसाव्यानंतर पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला. चार-पाच किलोमीटर अंतरावर पालखी सोहळा पुढे सरकल्यानंतर सातारा जिह्याची भौगोलिक हद्द समाप्त होते आणि सोलापूर जिह्याची हद्द सुरू होते. सातारा जिल्हाच्या अखेरच्या सरहद्दीवर पालखी सोहळा पोहोचल्यानंतर जिह्यातील प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्यावतीने पालखी सोहळ्यास निरोप देण्यात आला. सोलापूर जिह्यातील प्रशासन आणि अन्य लोकप्रतिनिधींच्यावतीने पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.