For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: जाऊं देवाचिया गांवां। देव देईन विसांवा।।, माउलींना फलटणकरांचा भावुक निरोप

10:45 AM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
vari pandharichi 2025  जाऊं देवाचिया गांवां। देव देईन विसांवा।।  माउलींना फलटणकरांचा भावुक निरोप
Advertisement

फलटण नगरीतील पालखी तळावर माउलींची विधिवत पूजा करण्यात आली

Advertisement

By : रमेश आढाव

फलटण :

Advertisement

जाऊं देवाचिया गांवां ।

देव देईन विसांवा ।।

देवा सांगों सुख दु:ख ।

देव निवारील भूक ।।

घालूं देवासीच भार ।

देव सुखाचा सागर ।।

राहों जवळी देवापाशीं ।

आतां जडोनि पायांसी ।।

तुका ह्मणे आह्मी बाळें ।

या देवाचीं लडिवाळें ।।

संतवाणीप्रमाणे माउलींच्या समवेत निघालेला वैष्णवांचा सागर फलटणकरांचा निरोप घेऊन बरड येथील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला. ऐतिहासिक फलटण नगरीत पहुडलेल्या वैष्णवांच्या सागराला पहाटे जाग आली प्रस्थानाची लगबग सुरू झाली माउलींना जागे करण्यात आले.

उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा ।

झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा ।।

या अभंग उक्तीप्रमाणे वारकरी राजाला पहाटे जाग आली. फलटण नगरीतील पालखी तळावर माउलींची विधिवत पूजा करण्यात आली. माउलींचा पालखी सोहळा फलटणच्या पालखी तळावरून मार्गस्थ झाला. हा सोहळा शहरातील पालखी मार्गावरून श्रीराम कारखान्यापर्यंत पोहोचला.

दरम्यान, शहरवासीयांनी दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी माउलींना नरोप दिला. वडणी येथे सकाळच्या पहिल्या विसाव्यासाठी पालखी सोहळा जात असताना पंढरपूर रस्त्यावरील फलटण हद्दीतील ओढा ओलांडताच रस्त्याच्या दुतर्फा असणारी विविध प्रकारची गर्द झाडे मार्गक्रमण करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आत्मिक समाधान देत होती.

सकाळच्या न्याहारीसाठी पालखी सोहळा विडणी येथे थांबला. दरम्यान, विडणी पंचक्रोशीतील भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळी विडणी ग्रामपंचायत आणि अन्य संस्थांच्यावतीने सोहळ्याचे स्वागत करून पालखी सोहळ्यातील विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला.

विडणी गावाच्या प्रवेशद्वाराजवळील ओठ्यावर काही वेळ पालखी विसाव्यासाठी थांबली होती. यावेळी माउलींची आरती झाली. माउलींच्या दर्शनासाठी विडणी पंचक्रोशीतील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र होते. न्याहरी आटोपून पालखी सोहळा पिंपरदकडे मार्गस्थ झाला पिंपरदवासियांनी पालखी सोहळ्याचे मनोभावे स्वागत केले. विठ्ठल नामाचा गजर करीत पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी पिंपरद येथे थांबला.

यावेळी माउली सेवेकरांच्यावतीने पादुकांना पंचामृतांनी अभिषेक घालण्यात आला. पिंपरदच्या शिवारात विसावलेल्या सोहळ्यातील वैष्णव व भक्तांच्या भोजनाच्या पंक्ती चालू होत्या. पिंपरद येथील दुपारच्या विसाव्यानंतर सोहळा वाजेगाव नाक्यावर आला. यावेळी या नागरिकांनी माउलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Advertisement
Tags :

.