संस्कार सारस्वत बॅडमिंटन विजेता
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे रविवारी झालेल्या गुवाहाटी मास्टर्स 100 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू संस्कार सारस्वतने पुरुष एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले तर महिलांच्या विभागात तन्वीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोधपूरच्या 19 वर्षीय संस्कारने आपल्याच देशाचा आणि माजी राष्ट्रीय विजेत्या मंजुनाथचा 21-11, 17-21, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना 50 मिनिटे चालला होता. संस्कारचे हे पहिलेच विजेतेपद आहे.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीन तैपेईच्या तुंग टाँगने भारताच्या तन्वी शर्माचा 21-18, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. तन्वीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पंजाबच्या 16 वर्षीय तन्वी शर्माने गेल्या आठवड्यात झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. तर गेल्या वर्षी तिने ओडिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद तसेच चालू वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात झालेल्या अमेरिकन खुल्या सुपर 300 दर्जाच्या त्याच प्रमाणे विश्व कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.
गुवाहाटीतील स्पर्धेत भारताच्या पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि साईप्रतिक यांना पुरुष दुहेरीत उपविजेतेपद मिळाले. मलेशियाच्या 6 व्या मानांकित झिंग आणि तेई यांनी पृथ्वी व साई प्रतिक यांचा 21-13, 21-18 असा पराभव केला.