For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सनमडीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक; आगीत ८ शेळ्या दगावल्या; 3 लाखाचे नुकसान

07:13 PM Apr 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
सनमडीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक  आगीत ८ शेळ्या दगावल्या  3 लाखाचे नुकसान
Advertisement

जत, प्रतिनिधी

जत तालुक्यातील सनमडी येथील नागू ज्ञानू म्हारनूर यांचे पत्रावजा गवती छप्परचे घर गॅस सिलेंडरच्या स्फोटात जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत आठ शेळ्या आगीत होरपळून दगावल्या आहेत. संसार उपयोगी साहित्य व रोख रक्कम असे मिळून तीन लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे म्हारनूर कुटुंब उघड्यावर पडले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सनमडी येथील नागू म्हारनूर यांचे घर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. ते मोलमजुरी करणारे गरीब कुटुंब आहे. शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर आजोबा व नात असे दोघेजण अंगणात झोपी गेले होते.

Advertisement

दरम्यान, रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाने दोघेही जागे झाले. परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते यातून घराशेजारी असणाऱ्या शेळ्यांच्या गोठयातूनही शेळ्या बाहेर काढता आल्या नाहीत. यात आठ शेळ्या जागीच आगीत होरपळून मृत्यू झाल्या. तसेच घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आलेली नव्हती.

या घटनेची माहिती मिळताच तलाठी अनुष्का जोशी , पशुसंवर्धन विस्तार अधिकारी कांबळे , उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे , इंडियन गॅसचे हाके , सिद्धू सलगर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव सलगर, सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन मनगू सलगर, पोलीस पाटील डॉ. साळुंखे, डॉ. खांडेकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

Advertisement

या जळीत कुटुंबास सनमडी गावातून लोकवर्गणीतून संसार उपयोगी साहित्य व धान्य देण्यात येणार असलेचे सिद्धू सलगर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.