सांकवाळचे वारसास्थळ आमच्यासाठी अयोध्याच!
हिंदू रक्षा महाआघाडी संघटनेची आक्रमक भूमिका : ‘फ्रंटीस पीस’ हटविण्याचे पुरातत्व खात्याला निवेदन
पणजी : सांकवाळ येथील श्रीविजयादुर्गा देवीचे मंदिर असलेल्या वारसास्थळी ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या नावाने चर्चसंस्थेने केलेले अतिक्रमण त्वरित हटवावे. तसेच या भूमीचे उत्खनन करून या जागेचा ऐतिहासिक वारसा जनतेसमोर आणावा, अशी मागणी गोव्यातील हिंदू रक्षा महाआघाडी संघटनेने केली आहे. ही जागा आमच्यासाठी अयोध्येसमान आहे, असेही संघटनेचे म्हणणे आहे. महाआघाडीचे राज्य प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काल गुरुवारी पुरातत्व खात्याचे संचालक नीलेश फळदेसाई आणि उपसंचालक दत्तराज गावस देसाई यांची भेट घेऊन त्यासंबंधी निवेदन सादर केले. त्यानंतर प्रा. वेलिंगकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. सदर वारसा स्थळ ताब्यात घेण्याच्या कारवाईविषयी महाआघाडीतर्फे लवकरच राज्यस्तरीय जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासंबंधी छोटी पुस्तिकाही छापण्यात आली आहे. ही जागा आमच्यासाठी अयोध्येसमान असून ती चर्चच्या घशात जाऊ देणार नाही, असा निर्धार शिष्टमंडळाने व्यक्त केला. या शिष्टमंडळात नितीन फळदेसाई, चंद्रकांत पंडित आणि सौ. शुभा सावंत यांचा समावेश होता.
चर्चकडून खोटी कथानके
गेल्या 11 वर्षांपासून चर्च संस्था खोटी कथानके रचून श्रीविजयादुर्गा देवीचे मंदिर असलेले ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसा स्थळ आपल्या ताब्यात घेऊ पाहत आहे. चर्च संस्थेने या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केले आहे. हे करताना त्यांनी वटवृक्ष तोडणे, पुरातन मंदिराचे अवशेष भूमीत गाडणे, आदी दुष्कृत्येही केली आहेत, असा दावा वेलिंगकर यांनी केला. गतवर्षी पुरातत्व खात्याने मुरगाव नगरनियोजन प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत या वारसा स्थळांचे संयुक्त सर्वेक्षण केले होते. त्यातून चर्च संस्थेने वारसा स्थळी अतिक्रमण केल्याचे उघड झाले होते. अतिक्रमणाची माहिती आता सरकारी कागदोपत्री आलेली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने तेथील अतिक्रमण हटवावे आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भूमीचे उत्खनन करून या जागेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जनतेसमोर आणावा, अशी मागणी प्रा. वेलिंगकर यांनी केली आहे.
प्रतिकात्मक मंदिर उभारण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव अमान्य
पोर्तुगिजांनी पाडलेल्या शेकडो मंदिरांचे प्रतिकात्मक रूप म्हणून एक मंदिर उभारण्याचा मुख्यमंत्र्यांनी ठेवलेला प्रस्ताव म्हणजे पलायनवाद आहे, अशी टीका महाआघाडीने केली आहे. हा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. स्वाभिमानी जनता तो कधीच स्वीकारणार नाही, असेही वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.