कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिहारमध्ये संजदचे 57 उमेदवार घोषित

06:06 AM Oct 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काही जागांच्या संदर्भात लोकजनशक्तीबरोबर वाद

Advertisement

वृत्तसंस्था / पाटणा

Advertisement

भारतीय जनता पक्षाने 71 उमेदवारांची नावे घोषित केल्यानंतर त्वरित संयुक्त जनता दलानेही बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 57 उमेदवारांची नावे घोषित करून विरोधी आघाडीला धक्का दिला आहे. तथापि, संयुक्त जनता दलाचा काही जागांच्या संदर्भात चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाशीही वाद होत आहे. त्यामुळे मतदानाचा पहिला टप्पा जवळ आला असतानाही दोन्ही आघाड्यांमधील वाद अद्यापही सुटलेले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तीन दिवसांपूर्वी जागावाटप घोषित केले आहे. या जागावाटपानुसार भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल हे आघाडीतील दोन मोठे घटकपक्ष प्रत्येकी 101 जागा लढविणार आहेत. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला 29 जागा तर हिंदुस्थान आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोकमोर्चा या छोट्या पक्षांना प्रत्येकी 6 जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रारंभी हे दोन पक्ष नाराज होते. तथापि, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या पक्षांची समजूत काढण्यात यश मिळविले.

संजद-लोकजनशक्ती वाद

संजदने बुधवारी घोषित केलेल्या मतदारसंघांपैकी काहींवर चिराग पासवान यांनी दावा केला होता. संजदने आपल्याशी विचारविनिमय न करताच आपल्या उमेदवारांची नावे घोषित केल्याने पासवान नाराज झाले आहेत. संजदच्या सूचीत संजय साडा (सोनबारसा), विद्यासागर निषाद (मोरवा) धुमलसिंग (एकमा), कुशल किशोर (राजगीर), राजकुमार सिंग (मैथानी) आणि कोमल सिंग (गायघाट) यांचा समावेश आहे. मात्र याच जागा पासवान यांच्याही मनात होत्या. त्यांवर संयुक्त जनता दलाने आपले उमेदवार घोषित केल्याने काहीसा तणाव निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत यश

पासवान यांच्या पक्षाला 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत 130 जागा लढवून केवळ एक जागा मिळविता आलेली होती. तथापि, नंतर 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने लढविलेल्या सर्व सहा जागा जिंकून प्रचंड यश मिळविले होते. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे महत्व वाढले आहे. त्याचप्रमाणे, त्यांची संयुक्त जनता दलाची असणारी स्पर्धाही वाढली आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

मतभेद किरकोळ, एकजूट अभेद्य

कोणत्याही आघाडीत जागावाटप होत असताना काही प्रमाणात कुरबुरी निर्माण होतच असतात. तथापि, आघाडीच्या सर्व पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये सामंजस्य आणि परस्पर विश्वास असेल, तर सर्व मतभेद दूर होतात. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विधानसभा निवडणुकीत गेली 20 वर्षे घवघवीत यश मिळत आलेले आहे. यंदाही जे काही मतभेद आहेत, ते त्वरित दूर होतील आणि आघाडी एकसंधपणे निवडणुकीला सामोरी जाईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनी व्यक्त केला आहे. येत्या एक दोन दिवसांमध्ये आघाडीतील सर्व पक्ष त्यांना मिळालेल्या जागांवर त्यांचे उमेदवार घोषित करतील आणि प्रचाराचा धडाका लावला जाईल, असा विश्वासही व्यक्त केला गेला.

दोन टप्प्यांमध्ये मतदान

आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये मतदानाचे दोनच टप्पे आहेत. प्रथम टप्पा 6 नोव्हेंबरला होणार असून द्वितीय टप्पा 11 नोव्हेंबरला होणार आहे. राज्य विधानसभेत एकंदर 243 जागा आहेत. त्यांच्यापैकी 121 जागांवर प्रथम टप्प्यात, तर उर्वरित 122 जागांवर द्विपीय टप्प्यात मतदान होणार आहे. मतगणना 14 नोव्हेंबरला होणार आहे. विधानसभेचा कालावधी 22 नोव्हेंबरपर्यंत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article