For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सांज्याव सांज्याव घुंवता मुरे’

01:21 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘सांज्याव सांज्याव घुंवता मुरे’
Advertisement

आज राज्यात ख्रिस्ती बांधवांचा सांज्याव उत्सव: सेंट जॉन बाप्तिस्ता यांचा जन्मदिवस

Advertisement

मडगाव : डोक्यावर काटेरी मुकूट, गळ्यात घुमट, हातात ‘पिराडे’ अशा पारंपरिक पेहरावात व ‘सांज्याव सांज्याव घुंवता मुरे, ‘सांज्याव पातोळ्यो मागोता’ असा सूर लावत गोमंतकीय ख्रिस्तीबांधव आज सोमवारी गटागटाने वाड्यावाड्यावर फिरणार आहेत आणि तेथील विहिरी, तलावात उड्या टाकत मौजमस्तीच्या माहोलात ‘सांज्याव’ साजरा करणार आहेत. या उत्सवाचे व पावसाचे खास नाते आहे. गेल्या काही दिवसांत चांगल्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने आजच्या दिवशीही तो कृपा करेल,अशी संबंधितांना आशा लागून राहिली आहे. अर्थात पावसाने हजेरी लावली नाही, तरी कृत्रिम पावसाची व्यवस्था करत उत्सवाची मजा अबाधित ठेवण्याची तयारी कित्येकांनी केली आहे.‘सांज्याव’ म्हणजे सेंट जॉन बाप्तिस्ता यांचा जन्मदिन साजरा करणारा उत्सव. दरवर्षी जून महिन्याच्या 24 तारखेला सदर उत्सव राज्यभर साजरा केला जातो. या उत्सवाला पारंपरिक महत्त्व असले, तरी अन्य काही उत्सवांप्रमाणे त्यालाही आता व्यावसायिक स्वरूप लाभले आहे. पारंपरिक प्रथा जपताना व्यावसायिकतेचीही जोड देऊन मागील दशकभरापेक्षा जास्त काळापासून सदर उत्सव साजरा केला जात आहे.

सासष्टी, बार्देशात अधिक बहर

Advertisement

ख्रिस्तीबांधवांचे लक्षणीय प्राबल्य जेथे आहे तेथे म्हणजे दक्षिणेत सासष्टी आणि उत्तरेत बार्देश तालुक्यात हा उत्सव अधिक मौजमस्तीनिशी साजरा केला जातो, सासष्टी व अन्य ठिकाणची हॉटेल्स, रिसॉर्ट्स तसेच स्थानिक क्लब यांनी त्याची जय्यत तयारी केली आहे. नृत्य, ‘रेन डान्स’ अशा माहोलात हा उत्सव साजरा केला जातो. ‘सांज्याव बॅश’ खाली यंदा काही ठिकाणी संगीत रजनींचे आयोजन रविवारी सांज्यांवच्या पूर्वसंध्येपासूनच करण्यात आले असल्याचे दिसून आले.पाण्यात मौजमस्ती करण्याची ही एक नामी संधी असल्याने ‘सांज्याव’मध्ये मित्रांसह सर्व जण हमखास भाग घेत असतात. यंदाही त्यात खंड पडणार नाही, अशी प्रतिक्रिया चार्ल्स फर्नांडिस या बेताळभाटीतील युवकाने व्यक्त केली. याखेरीज तारांकित हॉटेलांनी आपल्या जलतरण तलावाच्या ठिकाणी खास कार्यक्रम आयोजित केले असून अशा तलावांत उड्या मारून ‘सांज्याव’ साजरा करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

पारंपरिक पेहरावात उत्सव

पारंपरिक पेहरावात ‘सांज्याव’ साजरा करण्यासाठी निघालेली तऊणाई पाहण्याकरिता सासष्टीच्या किनारपट्टी भागांना भेट द्यावी लागेल. डोक्यावर काटेरी मुकूट, गळ्यात घुमट, पत्र्याचे डबे वा अन्य वाद्ये तसेच फुलांच्या माळा, हातात ‘पिराडे’ अशा पेहरावात आबालवृद्ध ‘सांज्याव सांज्याव घुंवता मुरे’ अशी गाणी गात वाड्यावाड्यावर फिरताना आढळतात. वाड्यावरील एखाद्या विहिरीत यातील काही तऊण तसेच उत्साही तऊणी आणि त्यांच्या बरोबरीने वृद्ध देखील उडी मारून दारूची बाटली,फळे घेऊन बाहेर पडताना दिसतात. सेंट बाप्तिस्ता यांच्या आईला मदर मेरीने ‘तुझ्या पोटी देवदूत जन्मास येईल’ असे सांगितल्यावर बाप्तिस्ता यांनी आईच्या पोटातच उड्या मारण्यास सुऊवात केली होती, अशी आख्यायिका आहे. त्यास अनुसरून विहिरीत वा तलावात उड्या मारण्याची प्रथा पडल्याचे सांगण्यात येते.

लोटली येथील ‘बिग फूट’मध्ये दरवर्षी हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. त्यात पातोळ्यो, सान्नां व इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तसेच पारंपरिक खेळ यांचा समावेश राहतो. अनेक गट यानिमित्ताने एकत्र येऊन गावातील जवळच्या विहिरीत उड्या मारताना पूर्वी दिसायचे. मात्र आता विहिरीत उडी मारणे घातक ठरू शकते याची जाणीव लोकांना झालेली आहे. त्यामुळे प्रमाण घटले आहे. रिसॉर्ट्समध्ये व्यावसायिक स्वरूपात हा उत्सव साजरा करण्याचे प्रकार वाढत चालले असले, तरी सासष्टी तालुक्याच्या अंतर्गत भागांमध्ये गेल्यास अजूनही या उत्सवाचे पारंपरिक स्वरूप बऱ्यापैकी दिसून येते, अशी माहिती मडगावाचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी दिली.

Advertisement
Tags :

.