संजय राऊत यांची सरकारवर टीका
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून टिकास्त्र
मुंबई
अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेवरून राजकीय वर्तुळात आरोप सुरु आहेत. या घटनेवरून संजय राऊत यांनी महाराष्ट्रात काय चाललं आहे? कुठेही कायदा आणि सुव्यवस्था राहीलेली नाही अशी टीका केली आहे.
या प्रकरणावर संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही, मुंबई असो, बीड प्रकरण असो किंवा परभणी असो, सगळीकडे कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पंतप्रधानांच आगतस्वागत, निवडणूक, शिबीरं यामध्ये सरकार गुंतून पडले आहे. सैफ अली खानवर राहत्या घरात हल्ला झाला, तो मोठा कलाकार आहे. पंतप्रधान मुंबईमध्ये बुधवारी होते, त्यामुळे सगळी सुरक्षा तिकडे असणार. जरी पंतप्रधान मुंबईमध्ये असले तरीही महाराष्ट्रात काय चाललं आहे, हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारला पाहिजे,अशी प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर खासदार संजय राऊत यांनी टीका केली.