जेसिका अल्बा घेणार घटस्फोट
16 वर्षांचा संसार संपुष्टात येणार
हॉलिवूड अभिनेत्री जेसिका अल्बा आणि तिचा पती कॅश वॉरेन हे विवाहाच्या 16 वर्षांनी घटस्फोट घेणार आहेत. दोघांच्या नात्यात दुरावा आला असून प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. नात्यात सगळं आलबेल नसलं तरीही या दोघांनी काही दिवसांपूर्वी मुलगा हैसचा सातवा वाढदिवस एकत्र साजरा केला. तर जेसिकाने त्यानंतर केलेल्या पोस्टमुळे ती वैवाहिक नात्यात आनंदी नसल्याचे स्पष्ट झाले होते.
43 वर्षीय जेसिका आणि 45 वर्षीय वॉरेन यांची पहिली भेट 2004 साली फॅन्टास्टिक फोरच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात अल्बाने स्यू स्टॉर्म म्हणून काम केले होते. तर वॉरेन सहाय्यक दिग्दर्शक होता. दोघांनी चार वर्षांनी 19 मे 2008 रोजी विवाह केला होता. या जोडप्याला दोन मुली तर एक मुलगा आहे. हॉनर 16 वर्षांची आहे तर हेवन 13 वर्षांची आहे, तर मुलगा हैस सात वर्षांचा आहे.