रिझर्व्ह बँक गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा रुजू
वृत्तसंस्था / मुंबई
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. या पदासाठी त्यांच्या नावाची घोषणा केंद्र सरकारकडून सोमवारी करण्यात आली होती. ते बँकेचे 26 वे गव्हर्नर म्हणून काम पाहणार आहेत. त्यांचा कार्यकाल 11 डिसेंबर 2024 पासून पुढे तीन वर्षे असेल. त्यांनी शक्तिकांत दास यांचे स्थान घेतले आहे. शक्तिकांत दास मंगळवारी निवृत्त झाले.
शक्तिकांत दास यांनी हे पद गेली सहा वर्षे सांभाळले होते. त्यांना तीन वर्षांची कालावधीवाढ देण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा कार्यकाल सहा वर्षांचा होता. आपल्या या प्रदीर्घ कालावधीत दास यांनी भारताचे पतधोरण सांभाळताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. महागाई नियंत्रण आणि विकास या दोन्हीमध्ये समतोल साधण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते, अशी माहिती देण्यात आली आहे.
संजय मल्होत्रा यांचा अल्प परिचय
संजय मल्होत्रा हे 1990 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. ते संगणक शास्त्र (काँप्युटर सायन्स) या विषयात इंजिनिअर असून हा अभ्यासक्रम त्यांनी कानपूर आयआयटीमधून पूर्ण केला आहे. त्यांनी अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून ‘सार्वजनिक धोरण’ (पब्लिक पॉलिसी) या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आता त्यांच्या हाती देशाचे पदधोरण ठरविणे, बँका आणि वित्तसंस्थांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे, तसेच भारतीय चलनाची व्यवस्था पाहणे असे महत्वाचे उत्तरदायित्व रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर या नात्याने आले आहे.