सफाई कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित
खानापूर न.पं. कामगारांनी नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी छेडले आंदोलन : 28 ऑक्टोबरनंतर निर्णय शक्य
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना नोकरीत कायम करून घेण्यात यावे या मागणीसाठी नगरपंचायतीसमोर मंगळवार दि. 22 पासून धरणे आंदोलन सुरू केले होते. आंदोलन बुधवारीही करण्यात आले. आंदोलनस्थळी पंचायत नोकर संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश बळ्ळारी यांनी भेट देवून आंदोलनकर्ते आणि नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सोमवारी बेळगाव येथे प्रोजेक्ट डायरेक्टर (पीडी) यांची भेट घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय घेतल्याने खानापूर नगरपंचायत सफाई कामगारांनी आपले आंदोलन सोमवारपर्यंत स्थगित केले आहे.
खानापूर नगरपंचायतीच्या सफाई विभागात काही कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत. वेळोवेळी नोकरीत कायम करून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र गेल्या 20-25 वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून ठेवल्याने 23 सप्टेंबर रोजी सफाई कामगारांनी सफाई कामगार दिनादिवशीच आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. त्यावेळी बेळगाव जिल्हा नगरपंचायतीचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांनी याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे सांगून आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते. मात्र गेल्या महिन्याभरापासून याबाबत प्रोजेक्ट डायरेक्टर यांनी याबाबत काहीही हालचाल केली नसल्याने नगरपंचायतीच्या सफाई कामगारानी मंगळवारपासून पुन्हा काम बंद आंदोलन सुरू करून ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू
बुधवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नगरसेवक लक्ष्मण मादार, प्रकाश बैलूरकर, मेघा कुंदरगी, माजी नगराध्यक्ष मजहर खानापुरी, रफिक वारीमणी यांनी आंदोलनकर्त्या कामगारांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्यासाठी चर्चा केली. मात्र कामगारानी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. यावेळी याबाबत नगरपंचायत कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बळ्ळारी यांच्याशी संपर्क साधून खानापूर येथे पाचारण केले.
प्रोजेक्ट डायरेक्टर यांची सोमवारी भेट घेणार
यावेळी नगरसेवक, मुख्याधिकारी संतोष कुरबेट, महसूल अधिकारी गंगाधर कांबळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सोमवार दि. 28 रोजी प्रोजेक्ट डायरेक्टर यांची भेट घेऊन चर्चा करणार असून, पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय घेऊ असे रमेश बळ्ळारी यांनी सांगितल्याने सफाई कामगारांनी आपले आंदोलन सोमवारपर्यंत स्थगित केले आहे. यावेळी खानापूर नगरपंचायत कामगार संघटनेचे अध्यक्ष शानूर गुडलार, यल्लाप्पा हंचनाळ, किरण केसरेकर, राजू गुरव यांच्यासह इतर कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.