संगोळी रायण्णाला हॉकीचा दुहेरी मुकुट
बेळगाव : आरपीडी महाविद्यालय आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ सिंगल झोन आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत पुरुष गटात संगोळी रायण्णा महाविद्यालयाने आरपीडीचा तर महिलांच्या गटात त्यांनी पिपल ट्री महाविद्यालयाचा पराभव करून आरसीयु चषक पटकाविला. आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पुरुष गटातील पहिल्या सामन्यात पिपलट्रीने एसबीके चिकोडीचा 1-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात संगोळी रायण्णाने कुसुमती मिरजी बेडकिहाळ संघाचा 2-0 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात आरपीडीने जीएसएसचा 1-0 असा निसटता पराभव केला. चौथ्या सामन्यात पिपल ट्रीने 2-1 असा जीएसएसचा पराभव केला. पाचव्या सामन्यात संगोळी रायण्णाने गोगटेचा 2-0 असा पराभव केला.
तिसऱ्या क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात गोगटेने पिपल ट्रीचा बेळगावचा 2-0 असा पराभव करून तिसरे स्थान पटकाविले. अंतिम सामना संगोळी रायण्णा व पिपल ट्री संघात झाला. या सामन्यात संगोळी रायण्णाने पिपल ट्रीचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. महिलांच्या गटातील पहिल्या सामन्यात संगोळी रायण्णा कॉलेजने बी. के. कॉलेज चिकोडीचा 3-1 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात आरपीडीने केएलएस गोगटेचा 2-0 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात संगोळी रायण्णाने जीएसएस बेळगावचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात जीएसएस संघाने गोगटेचा टायब्रेकरमध्ये 2-1 असा पराभव केला. अंतिम सामन्यात संगोळी रायण्णाने आरपीडीचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. बक्षिस वितरण समारंभाला जलतरणपटू प्रशिक्षक प्रसाद तेंडूलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय पाटील, उत्तम शिंदे, डॉ. रामकृष्ण यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.