For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : सांगलीत पोलिस कॅन्टीन घोटाळा: व्यवस्थापकाला पाच दिवसांची कोठडी

02:59 PM Dec 03, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत पोलिस कॅन्टीन घोटाळा  व्यवस्थापकाला पाच दिवसांची कोठडी
Advertisement

                             ‘संस्कृती सबसिडी कॅन्टीन’मध्ये ७४ लाखांचा अपहार उघड

Advertisement

सांगली : जिल्ह्यातील पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदी करता यावी, यासाठी सुरू केलेल्या 'संस्कृती सबसिडीजर कॅन्टीन' मध्ये ७४ लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याबाबत कॅन्टीन व्यवस्थापक हवालदार भुपेश भीमराव चांदणे (वय ४२, रा. अयोध्यानगर, संजयनगर, सांगली) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली.त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. पोलिस कल्याण शाखेचे तत्कालीन निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तत्कालीन पोलिस निरीक्षक दिलीप सावंत यांनी साधारण दहा वर्षापूर्वी पोलिसांसाठी कॅन्टीन सुरू केले होते. किराणा मालासह वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स वस्तूंची देखील विक्री होत होती. कॅन्टीनचा व्यवस्थापक असलेल्या हवालदार चांदणे याने साधारणपणे तीन वर्षापासून कॅन्टीनमध्ये गैरव्यवहार सुरू केला. लेखापरीक्षक विश्वेश देशपांडे अॅन्ड कंपनीने एक एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या वर्षाचे लेखापरीक्षण केले. तेव्हा सुपरवायझर अकाऊंट कॅश आणि नफ्यात १९ लाख ८० हजारांची तफावत आढळली. स्टॉकमधील तफावत ४ लाख ४८ हजार रूपये, सुपरवायझर डेटर्समध्ये २० लाख ८० हजार रूपये अशी एका वषात ४५ लाख ८ हजार ७५५ रूपयांची तफावत आढळली.

Advertisement

एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षात २८ लाख ९४ हजार ८१२ रूपयांची तफावत आढळून आली. दोन वर्षात ७४ लाख ३ हजार ५६७ रूपयांची तफावत आढळल्याबाबत लेखापरीक्षक देशपांडे यांनी अहवाल पोलिस कल्याण विभागास दिला. त्यांनी हा अहवाल पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना सादर केला. अधीक्षक घुगे यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले. अधीक्षक घुगे यांनी व्यवस्थापक चांदणेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक के. सी. स्वामी अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Tags :

.