सांगलीच्या यश खंडागळेला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण
7 वी खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार : कुस्तीचा थरार आजपासून
वृत्तसंस्था/ राजगीर (बिहार)
वेटलिफ्टिंगमधील महाराष्ट्राचा सुवर्णपदकाचा धडाका 7 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत दुसर्या दिवशीही कायम राहिला. सांगलीच्या यश खंडागळेने 67 किलो गटात सुवर्ण‘यश मिळवित आजचा दिवस गाजविला. टेनिस एकेरीत महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर, ऐश्वर्या जाधव यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
राजगीर क्रीडा विद्यापीठाचा परिसरात ही स्पर्धा सुरू आहे. वेटलिफ्टिंग स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात सांगलीच्या यशने स्नॅच प्रकारात 122 किलोची सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. पाठोपाठ क्लिन अॅण्ड जर्क प्रकारातही पहिल्याच प्रयत्नात त्याने 145 किलो हे सर्वाधिक वजन पेलले. स्नॅच व क्लिन अँन्ड जर्क प्रकारात दुसर्या व तिसर्या प्रयत्नात अधिक वजन उचलण्यात तो अपयशी ठरला. पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी करीत एकूण 267 किलो वजनाची खेळी करीत यशने सुवर्णपदकाला गवसणी घातली. आसामच्या अभिनोब गोगाईने 251 किलो तर हरियाणाच्या समीर खानने 241 किलो वजनाची कामगिरी करीत अनुक्रम रौप्य व कांस्य पदकाचा नाव कोरले.
सुवर्णपदक विजेता यशचे खेलो इंडिया स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. 2023 मधील मध्यप्रदेशमधील स्पर्धेत तो 8 व्या स्थानावर होता. गत तामिळनाडू स्पर्धेत तो पात्र ठरला नव्हता. सांगलीत यशच्या वडिलांचे सलूनचे छोटेखानी दुकान असून तो मयुरा सिंहासने यांच्या व्यायामशाळेत कसून सराव करत असतो. तब्बल 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यशचे पदकाचे स्वप्न साकार झाले आहे. आता मला राष्ट्रकुल पदक जिंकयचे आहे, यासाठी हे यश प्रेरणा देणारे असेल, असे यशने सांगितले.
टेनिसमध्ये अर्णव, ऐश्वर्या उपांत्य फेरीत
खेलो इंडिया युवा स्पर्धेतील टेनिस एकेरीत महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर, ऐश्वर्या जाधव यांनी उपांत्य फेरीत मजल मारली आहे. पाटना शहरात सुरू असलेल्या टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढतीत महाराष्ट्राच्या अर्णप पापरकर याने दिल्लीच्या रियान शर्माला 7-6, 6-2 असे सरळ सेटमध्ये नमवले. कराडमधील अर्णव प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेत खेळत असून, तो पुण्यात सराव करीत असतो.
मुलींच्या एकेरीतही महाराष्ट्राच्या ऐश्वर्या जाधव हिने उपांत्य लढत जिंकली. कर्नाटकच्या कशवी सुनीलला 6-3, 6-2 असे सेटमध्ये नमवित ऐश्वर्या जाधव हिने सलग दुसर्या वर्षी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मुलींच्या दुहेरीतही ऐश्वर्या जाधव व आकृती सोनकुसारे जोडीने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
अॅथलेटिक्स, कुस्तीचा थरार आजपासून
पाटना : बिहारमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा आता उत्तरार्थ सुरू झालाय. अॅथलेटिक्स स्पर्धेचा थरार उद्यापासून (दि.12) पाटणा शहरातील पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये रंगणार आहे. कुस्ती स्पर्धेलाही सोमवारपासुन सुरूवात होत असून दहा पेक्षा अधिक पदकांची अपेक्षा आहे.
अॅथलेटिक्समध्ये यंदा 17 मुली व 11 मुले असा एकूण महाराष्ट्राचा 28 खेळाडूंचा संघ मैदानावर आपले कौशल्य पणाला लावताना दिसेल. गतवर्षीच्या खेलो इंडिया स्पर्धेतत महाराष्ट्राने 38 खेळाडूंचा चमू मैदानावर उतरविला होता. त्यावेळी महाराष्ट्राने 5 सुवर्ण, 6 रौप्य व 7 कांस्य अशी एकूण 18 पदकांची लयलूट केली होती. यावेळीच्या संघात मुलांची संख्या कमी आहे. मात्र, तरीही महाराष्ट्राचे खेळाडू नक्कीच डझनभर पदके जिंकलीत. शौर्या अंबोरे हिच्याकडून 100 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. याचबरोबर आदित्य पुजारी, रूद्र शिंदे, आदित्य पिसाळ, हर्षल जोगी, जान्हवी बिरुडकर, प्रणाली मंडले, अर्जून देशपांडे, सई चाफेकर असे अनेक अॅथलिट यावेळी पदकाचे दावेदार आहेत, अशी माहितीही सुहास व्हानमाने यांनी दिली.
जिम्नॅस्टिक्स : सारा, अनुष्का, किमया पदकाचे दावेदार
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक पथकातून सारा राऊळ, अनुष्का पाटील, शताक्षी टक्के, उर्वी वाघ, किमया कार्ले, यशश्री मोरे,तर मुलांमध्ये सनय किर्लोस्कर आणि कौस्तुभ अहिरे हे खेळाडू 7 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धा पदकाचे दावेदार आहेत. जिम्नॅस्टिक या प्रकाराला नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये रविवारपासून (दि. 11) सुरूवात झाली. गत खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने संयुक्ता काळे हिने जिंकलेल्या पाच सुवर्णपदकसह एकूण 12 पदके जिंकली होती. यावेळी संयुक्ताचे वय स्पर्धेसाठी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने ती संघात नाही. यावेळी 11 मुले आणि 9 मुली असे महाराष्ट्राच्या एकूण 20 खेळाडूंचे पथक जिम्नॅस्टिकमध्ये सहभागी झाले आहे.