For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामेशकडून प्रदीप घुटण्यावर चीतपट

10:02 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
कामेशकडून प्रदीप घुटण्यावर चीतपट
Advertisement

किणये कुस्ती मैदान : रोहित पाटीलची बाजी

Advertisement

बहाद्दरवाडी : बाल हनुमान कुस्ती संघटना किणये यांच्यावतीने खास चौराशी देवी यात्रेनिमित्त गुऊवारी सायंकाळी सरस्वती हायस्कूल जवळील शिवारात भव्य जंगी कुस्ती मैदानात कंग्राळीच्या कामेश पाटीलने सांगलीच्या महाराष्ट्र चॅम्पियन प्रदीप ठाकूरला घुटणा डावावर चीत करून तर रोहित पाटील कंग्राळीने मोहन नारे वर प्रेक्षणिय विजय मिळविला. मैदानात बालकांच्या तसेच नामवंत मल्लांच्या 30 हून अधिक रंगतदार कुस्त्या झाल्या. आखाड्यात प्रथम क्रमांकची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन कामेश पाटील विऊद्ध महाराष्ट्र चॅम्पियन प्रदीप ठाकूर ही कुस्ती माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश डुकरे, ग्रामपंचायत सदस्य माऊती डुकरे, महेश डुकरे, रामलिंग गुरव, निवृत्ती डुकरे, पुंडलिक दळवी, लक्ष्मण बामणे, पिराजी मुचंडीकर, मोनापा पाटील, प्रभाकर पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. प्रारंभी दोघांनी एकमेकांची ताकद आजमावली. सांगलीच्या प्रदीप ठाकूरने एकेरी पट काढून कामेशवरती कब्जा मिळविला. 10 व्या मिनिटावरती कामेशने एकेरी पट काढून प्रदीपवर कब्जा मिळवित मानेचा कस काढून मजबूत घुटण्याची पकड मिळविली व घुटणा डावावर चीत करुन उपस्थित कुस्तीशौकिनांची मने जिंकली. कुस्तीसाठी पंच म्हणून महेश डुकरे यांनी काम पाहिले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कंग्राळीच्या रोहित पाटील विऊद्ध महाराष्ट्र चॅम्पियन सांगलीचा मोहन नारे ही कुस्ती ज्ञानेश्वर सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक यांच्या हस्ते लावण्यात आली. 5 व्या मिनिटाला रोहितने पायाला चाट मारुन मोहनवर ताबा मिळविला. मात्र मोहनने त्यातून सुटका करून घेतली. लागलीच रोहितने एकेरी पट काढून मोहनवर ताबा मिळवित 13 व्या मिनिटावर रोहितने मोहनला चीत करून विजय मिळविला. पंच म्हणून सुरेश डुकरे यांनी काम पाहिले.

तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महेश तीर्थकुंडे विऊद्ध सुरेश अथनी यांच्यामध्ये किनये गावातील निवृत्त सैनिकांच्या हस्ते लावण्यात आली. ही कुस्ती आखाड्यात ही कुस्ती डावप्रतीडावाने 20 मिनिटे झुंजली. वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. पंच म्हणून कृष्णा पाटील यांनी काम पाहिले. चौथ्या क्रमांकाची कुस्ती पार्थ पाटील कंग्राळी विऊद्ध यलारलिंग निर्वाणट्टी यांच्यात झाली. 10 व्या मिनिटाला पार्थ पाटीलने दुहेरी पट उपसत यलारलिंगला खाली घेत पायाला एकलांगी बाधून एकलांगी डावावर विजय मिळवित उपस्थित कुस्तीशौकिनांकडून वाहवा मिळविली. या कुस्तीसाठी पंच म्हणून लक्ष्मण बामणे होते. पाचव्या क्रमांकच्या कुस्तीमध्ये ऊपेश करलेने एक लांगी डावावर ओम कंग्राळीला चीत केले. सुरज कडोली व विनायक येळ्ळूर यांच्यात सहाव्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. खाड्यात दयानंद कर्ले व भूमिपुत्र मुतगा, नचिकेत रणकुंडे व प्रज्वल मच्छे, निवृत्ती किणये व हरी खादरवाडी, महांतेश संतीबस्तवाड व नागराज गंदीगगवाड, ओमकार खादरवाडी व ओमकार संतीबस्तवाड आदींच्या कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या. ओमकार खादरवाडी व बसवंत यांच्या कुस्तीमध्ये ओमकार विजयी झाला. समर्थ किणये व समर्थ कडोली यांच्यात झालेल्या कुस्तीत समर्थ किणये विजयी झाला. तसेच विठ्ठल गुरव यांने प्रताप खादरवाडीवरती विजय प्राप्त केला.

Advertisement

अखाड्यातील आकर्षक कुस्तीमध्ये रोहन कडोलीने विकास चापगावला चीत करून विजय मिळविला. या कुस्तीसाठी पंच म्हणून पिराजी मुचंडीकर यांनी काम पाहिले. आखाड्यात मेंढ्याची समर्थ डुकरे व आर्यन मुतगा यांच्यामध्ये चौराशी देवी मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या सर्व सदस्यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. 5 व्या मिनिटाला समर्थ डुकरेने आर्यनला चीत करून मेंढ्याचे बक्षीस पटकाविले. पंच म्हणून मोनापा पाटील यांनी काम पाहिले. तुकाराम डुकरे किणये व समाधान कडोली यांच्यात गदासाठी झालेल्या लढतीत तुकारामने समाधानचा पराभव करीत गदेचा मानकरी ठरला. महिलांच्या विशेष कुस्तीत शितल खादरवाडी व श्रावणी आंबेवाडी यांच्यात रंगतदार अशी कुस्ती झाली. या दोन्ही महिला कुस्तीपटूंनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत कुस्तीला सुऊवात केली. 5 मिनिटे ही कुस्ती रंगली आणि श्रावणीने शितलला चीत करून विजय मिळविला. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती प्रभा खादरवाडी व राधिका संतीबस्तवाड यांच्यात झाली. तिसऱ्या मिनिटाला राधिकाने प्रभाला चीत करून विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत राधिका बसवाडकर व स्वाती कडोली यांच्यातील लढतीत स्वातीने विजय मिळविला. महिला कुस्त्यांसाठी पंच म्हणून कृष्णा पाटील यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन राजू मुचंडीकर व पुंडलिक दळवी यांनी केले.

Advertisement
Tags :

.