पाणीपुरवठा विभागाकडील चार कर्मचारी निलंबित; आयुक्त शुभम गुप्ता यांचा दणका
पाईप इन्स्पेक्टरसह तीन मीटर रीडरचा समावेश : बोगस कनेक्शन, बिल अपहारप्रकरणी कारवाई
सांगली प्रतिनिधी
महापालिकेच्या पाणीपुरवठा व पाणीपट्टी विभागाकडील चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रभारी पाईप इन्स्पेक्टर नितीन रमेश आळंदे यांच्यासह राजन हर्षद, सूरज शिंदे व प्रितेश कांबळे या तीन मीटर रीडरचा समावेश आहे. बोगस नळ कनेक्शनसह कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी ही कारवाई केली.
महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग सातत्याने चर्चेत आहे. विशेष म्हणजे बोगस नळ कनेक्शन, बिलामधील अपहाराचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. पाईप इन्स्पेक्टरच्या आशीर्वादामुळे महापालिका क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बोगस नळ कनेक्शनचे पेव फुटले आहे. काही दिवसांपूर्वी वाघमोडे नगर, जयहिंद कॉलनी (साखरे प्लॉटजवळ) सहा इंची जलवाहिनीला एका खासगी प्लॉट धारकाने परस्पर क्रॉस कनेक्शन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याशिवाय सर्किट हाऊसजवळ, अंबाईनगर येथेही परस्पर बोगस नळकनेक्शन देण्यात आले होते. परिसरातील प्रभारी पाईप इन्स्पेक्टरचा याला आशीर्वाद असल्याची चर्चा होती. यासह कुपवाडमध्येही एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये 10 ते 12 बोगस नळ कनेक्शन सापडली होती.
यासह अन्य तक्रारी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने पाणीपुरवठाकडील चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एका पाईप इन्स्पेक्टरसह तीन मीटर रीडरचा समावेश आहे. नितीन रमेश आळंदे हे पाणीपुरवठाकडे प्रभारी पाईप इस्पेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांनी सर्किट हाऊसजवळील अंबाई नगर परिसर येथील भावेश शहा यांना विना परवाना पाणी कनेक्शन दिल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले होते. अधिकाराचा दुऊपयोग करणे, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
तीन मीटर रीडरही निलंबित
यासह पाणीपट्टी विभागातील तीन मीटर रीडरचेही निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये राजन हर्षद, सूरज शिंदे व प्रितेश कांबळे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बिले न वाटणे, बिल कमी करणे, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अजून पाच ते सहा कर्मचाऱ्यांची चौकशी सुऊ आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. .