विट्यातील विशाल पाटील टोळी हद्दपार! टोळीवर गंभीर आरोप
विटा प्रतिनिधी
विटा पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड वरील गुन्हेगार विशाल पाटील टोळीस सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्हयातुन दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार आदेश पारीत केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काढुन त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभुमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. विशाल पाटीलसह सात जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.
विशाल प्रशांत पाटील (२४ वर्षे, रा. शाहुनगर, विटा ता. खानापुर, जि. सांगली), अमरजित अनिल क्षिरसागर(२२ वर्षे, रा. पाटील वस्ती, विटा. ता. खानापुर जि. सांगली), अमृत राजेंद्र काळोखे( २४ वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली), शुभम महेश कोळी(२५ वर्षे, रा. कदमवाडा, विटा, ता. खानापूर, जि. सांगली), किसन राजेंद्र काळोखे, (३० वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता. खानापुर, जि. सांगली.), विजय राजेंद्र काळोखे (२४ वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता. खानापुर, जि. सांगली), सागर देवेंद्र गायकवाड( २७ वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता. खानापुर, जि. सांगली) अशा सात जणांवर हद्दपार कारवाई करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक मेमाणे यांनी सांगितले.
या टोळीविरुद्ध २०१९ ते २०२३ मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून खुन, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर बिगरपरवाना अग्निशस्त्र जवळ बाळगुन दहशत माजवणे, गैरकायदयाची मंडळी जमवून इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, अपहरण करून इच्छापुर्वक दुखापत करणे, बांधकामास लागणारे साहित्याची तसेच मोटारसायकल व इतर चोरी करणे असे गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या प्रस्तावाचे अवलोकन करुन, चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन या सात जणांना सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे. गुन्हे करणा-या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवुन त्या नेस्तनाबुत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे, हवालदार अमोल ऐदाळे, अमर नरळे, दिपक गट्टे, विलास मोहिते, वैभव कोळी यांच्या पथकाने केली.