विट्यात मजुराचा डोक्यात फरशी घालून खून; बारा तासात संशयित आरोपी गजाआड
विटा प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून डोक्यात फरशी घालून खून केल्याची घटना विटा शहरात उघडकीस आली. राजेंद्र भाऊसो यादव (58, कडेपूर, ता. कडेगांव) असे खून झालेल्या मजुराचे नांव आहे. ही घटना गुरूवारी 30 मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास येथील कराड रस्त्यावर घडली. याबाबत पार्थ विकास यादव यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संशयित सागर अशोक वाघमारे (30 शाहूनगर, विटा, ता. खानापूर) यास अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील कराड रस्त्यावरील नेवरी रस्त्यावरील गुरूप्रसाद प्लाझा इमारतीच्या समोर दोन मजुरांची आपसात किरकोळ कारणावरून वादावादी झाली. यामध्ये संशयित सागर अशोक वाघमारे (30, मूळ रा. कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा, सध्या रा. शाहूनगर, विटा, ता. खानापूर) याने राजेंद्र यादव यांच्या डोक्यात फरशी मारल्याने ते गंभीर जखमी झाले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शरद मेमाने यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी राजेंद्र यादव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले, अशी माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली.
दरम्यान नेवरी नाक्यावर खून झाल्याची माहिती समजताच शहरात खळबळ माजली. बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने यंत्रणा गतिमान करीत संशयित सागर वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने गुह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मेमाने यांनी दिली. विटा पोलिसांच्या पथकाने अवघ्या बारा तासात खुनाचा छडा लावत संशयित आरोप सागर वाघमारेच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता 6 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक मेमाने यांनी दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक शरद मेमाने करीत आहेत.