बोगस वैद्यकीय व्यवसायिकांबरोबरच बेकायदा लॅबवर कारवाई करा
जिल्हाधिकाऱ्यांचे आढावा बैठकीत आदेश
सांगली प्रतिनिधी
बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरूद्ध कडक कारवाई करण्याबरोबरच बेकायदा लॅबरोटरीवर कारवाईचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिले. शुक्रवारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सामितीची बैठक झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, प्रभारी पोलीस उपाधिक्षक तथा समितीचे सदस्य सचिव अरविंद बोडखे, अशासकीय सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील, सुरेश पाटील यांच्यासह अन्य शासकीय, अशासकीय सदस्य उपस्थित होते.
बोगस डॉक्टर यांची माहिती मिळविण्यासाठी मान्यताप्राप्त डॉक्टर यांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचिवणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरी भागात जनजागृती फलक, ग्रामीण भागात ग्राम पंचायत स्तरावर विविध माध्यमातून जनजागृती करावी. त्यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांची मदत घ्यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी यावेळी दिल्या. तालुकानिहाय बोगस डॉक्टरांची माहिती काढण्याच्याही यावेळी सुचना देण्यात आल्या.
या बैठकीत जिल्ह्यातील अवैधरीत्या सुरू असलेल्या सर्व लॅबोरेटरी चालकांवर अवैध वैद्यकीय व्यावसायिक म्हणून कारवाई करण्यासाठी सर्वेक्षण करावे, जिल्ह्यात अवैधरित्या औषधोपचार करण्राया बोगस व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच, अनधिकृत डेंटल लॅब चालवणाऱ्या विरूद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी गर्भलिंग करून स्त्री भ्रुण हत्या करतेवेळी मृत झालेल्या महिलेचा मृतदेह सांगलीत घेऊन फिरणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर पोलीसांनी कारवाई केली आहे. त्याचे पुढे काय झाले याबाबत डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रदिर्घ काळानंतर झालेल्या या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली.