शॉर्ट सर्किटमुळे गोठा, घर जळून खाक ! ५ लाखांपेक्षा जास्त नुकसान; आगीत ३ जनावरे होरपळून दगावली
सोनी वार्ताहर
भोसे (ता मिरज) येथील देवेंद्र बापू चौगुले यांच्या गोठ्याला विजेच्या खांबावर शाॅर्ट सर्किट होऊन आग लागल्यामुळे कौलारू घर व गोठा जळून खाक झाला. गोठ्यात बांधलेली व्यायला झालेली देशी खिल्लार गाय व म्हैस यांच्या सह तीन जनावरेही आगीच्या भस्मसात झाली. आग लागून गोठा व घर जळाल्याचे कळताच घटनास्थळी बघ्यानी गर्दी केली होती.
देवेंद्र चौगुले यांची सोनी - भोसे रस्तालगत सोनी हद्दीत शेती आहे. शेतातच त्यांनी गोठा तसेच छोटे घर बांधले आहे. सोमवारी रात्री शेतीला पाण्याची रात्री लाईट असल्याने व एक खिल्लार जातीची गाय व्यायला झाली असल्याने ते रात्री एक वाजेपर्यंत शेतातील घरात होते. त्यानंतर मोटर बंद करून गावातील घरी गेल्यावर रात्री अडीच ते तीन च्या सुमारास घराशेजारी असलेल्या विजेच्या खांबावर शाॅर्ट सर्किट होऊन आग लागली असल्याचा अंदाज आहे. रात्री आग लागली असल्याने आणि शेजारी लगत कोणाची वस्ती नसल्याने आग लागल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. पहाटे चारच्या सुमारास भोसेचे माजी सरपंच विकास चौगुले यांचे भाऊ द्राक्ष बागेला पाणी सोडण्यास मोटर चालू करण्यासाठी आल्यावर आग लागल्याचे कळाले. तातडीने माहिती देऊन अग्निशमन विभागास कळविण्यात आले. अग्निशमन विभागाच्या पथकाने आग विझवली पण तोपर्यंत जनावरे व घर पुर्ण पणे जळून खाक झाले होते. आग लागून जनावरांचा दुर्दैवी झालेला अंत पाहुन बघणाऱ्याचे मन हेलावून गेले होते. शेतातील घरात शेतीला लागणारी औषधे तसेच संसारोपयोगी साहित्य होते. एकूण जवळपास पाच लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.
.घटनास्थळी पालकमंत्री नामदार सुरेश खाडे यांनी भेट देऊन चौगुले कुटुंबाला आधार दिला व जी काही शासकीय मदत करता येईल ती करण्याचे आश्वासन दिले तसेच तातडीची मदत म्हणून पालकमंत्री यांनी दहा हजार व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांनी पाच हजार रुपये चौगुले कुटुंबीयांना देऊ केली. यावेळी सर्कल पी. वाय. ओमासे, तलाठी सुनील सूर्यवंशी, पशुसंवर्धन विस्तार अधिकारी अशोक चव्हाण , मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुलाणी , सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील, भोसेचे सरपंच पारिसनाथ चौगुले, माजी सरपंच विकास चौगुले, विकास सोसायटीचे अध्यक्ष दादासो चौगुले, सोनीचे माजी सरपंच राजेंद्र माळी, सोनीच्या पोलीस पाटील प्रज्ञा पाटील, भोसेच्या पोलीस पाटील शोभाताई कदम उपस्थित होते.