आंध्रात दरोडा टाकलेली टोळी जेरबंद; पावणे दोन कोटीचे सोने जप्त
आंध्र प्रदेश आणि स्थानिक गुन्हा अन्वेषणची संयुक्त कारवाई
सांगली प्रतिनिधी
आंध्र प्रदेशात सोने गलाई व्यावसायिकाच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून त्याला गंभीर जखमी करून लूट करणाऱ्या तिघा आरोपींना आंध्र पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जेरबंद केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करीत, त्यांच्याकडून एक कोटी 77 लाखांचे तीन किलो सोने जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये सूरज बळवंत कुंभार, (33), व्यवसाय गलाई कामगार, रा. कुर्ली, ता. खानापूर, जि. सांगली, कैलास लालासाहेब शेळके, (30), व्यवसाय मजुरी रा. मु. पो. बामणी, ता. खानापूर, जि. सांगली, सादीक ताजुद्दीन शेख, (35), व्यवसाय मजुरी रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या संशयितांचा समावेश आहे.
फिर्यादी नामदेव गुऊनाथ देवकर (40) रा. वंगुरीबाडी रोड, टनुकू, ता. टनुकू, जि. पश्चिम गोदावरी, राज्य आंध्र प्रदेश येथे त्यांचा सोने गलाईचा व्यवसाय असून ते सोने तारण व्यवसाय देखील करतात. आरोपी सूरज बळवंत कुंभार, व्यवसाय- गलाई कामगार, रा. कुर्ली, ता, खानापूर, जि. सांगली हा मागील चार वर्षापासून फिर्यादी यांचे दुकानात काम करीत होता. फिर्यादी व त्यांची पत्नी त्यांच्या घरी असताना आरोपी सूरज बळवंत कुंभार व इतर साथीदारांनी घरात घुसून फिर्यादीस हत्याराचा धाक दाखवून हात-पाय बांधून व तोंडावर चिकटपट्टी लावून घरातील तिजोरीमधील सोन्याचे दागिने व बिस्किटे आणि रोख रक्कम एक लाख ऊपये जबरदस्तीने लुटून फिर्यादीची सिल्व्हर रंगाची अल्टो कार घेवून पसार झाले होते. त्याबाबत फिर्यादी यांनी टनुकू टाऊन पोलीस ठाणे येथे याबाबत सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुह्याच्या तपासासाठी आंध्रप्रदेश राज्यातील पोलीस पथक सांगली जिल्ह्यात आले होते.
स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपा†नरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक तयार करून आंध्र प्रदेश राज्यातून आलेल्या पोलीस पथकासोबत या संशयितांचा शोध सुरू केला होता. गुह्यातील आवश्यक आरोपी हे विटा ते सांगली जाणारे रोड बुधगाव गावचे हद्दीतील राजाधिराज ढाब्यासमोर आले आहेत. याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे आंध्र येथील पोलीस उपाधीक्षक सी. सरय राजकुमार आणि पथक आणि सांगलीच्या पथकाने याठिकाणी सूरज बळवंत कुंभार, कैलास लालासाहेब शेळके आणि सादीक ताजुद्दीन शेख, या तिघांना पकडले आणि त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले. या दागिन्याबाबत व मालकी हक्काबाबत त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पथकांतील अधिकारी यांनी त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, हे दागिने हे गेल्या महिन्यात टनुकू राज्य आंध्रप्रदेश येथे दरोडा टाकून चोरी करून घेवून आलो आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या पुढील तपास आंध्र प्रदेश येथील टनुकू पोलीस करत आहेत.