अजितदादांनी टाळले आर. आर. आबांना अभिवादन! तुम्ही काय इज्जत राखली ? राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दादांचा रोखठोक प्रश्न
प्रतिनिधी / तासगाव
आर. आर. आबांना प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री मी केले. हेलीकॉप्टर मी पाठवले. तुम्ही माझी काय राखली? 'उतरायला लागतंय' वगैरे काही नाही... असा आपला राग व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तासगावात दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हार स्वीकारणे टाळले. पुढे जाऊन त्यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांचा हार स्वीकारला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वासराव पाटील, अमोल शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रोटोकॉल पाळत तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांच्या स्वागताला उपस्थित असतात. विट्याहून आ. बाबर परिवाराचे सांत्वन करून सांगलीला चाललेल्या अजितदादांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मार्केट यार्डातील आर. आर. पाटील यांच्या पुतळ्यासमोर घोळक्याने जमले होते. गर्दी पाहून जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी तेथे गाडी थांबवली. तेव्हा अमोल शिंदे, विश्वासराव पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अजितदादांना गाडीतून उतरण्याची विनंती केली. मार्केट यार्डाला भेट द्या आणि आबांच्या पुतळ्याला हार घालून आमचा सत्कार स्वीकारा, असे आवाहन त्यांनी केले. मात्र अगदी आठवडाभर आधीपर्यंत आबा गटाची वाट पाहणाऱ्या अजितदादांना आबा परिवाराचा सकारात्मक संदेश मिळाला नाही. त्यामुळे दादांनी हे कार्यकर्ते आबांचे आहेत हे जाणले आणि आपला दुसरा संदेश देऊन टाकला.
आपण आताच एका कुटुंबाचे सांत्वन करून आलो आहोत, पुन्हा खाली उतरणे योग्य नाही, असे प्रथम सांगून टाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी 'यायला लागतंय', असे आग्रहाने बोलताच दादांनी आपले ठेवणीतले शब्द बाहेर काढले. आबांच्या सर्व महत्वाच्या निर्णयात मीच होतो. मात्र तुम्ही माझी किंमत राखली नाहीत, असा त्यांचा स्वर होता. कार्यकर्त्यांनी दिलेले तासगाव चे प्रसिद्ध बेदाणे त्यांनी स्वीकारणे टाळले. दादांच्या या रूद्रावतारापुढे नमते घेत कार्यकर्ते मागे सरकले आणि दादांचा ताफा पुढे गेला. कार्यकर्त्यांनी बेदाणे गाडीत मागे ठेवून दिले. पुढच्याच चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दादांनी नव्याने नियुक्ती दिलेले त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी उभे होते. दादांनी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. तेथेच भाजप खासदार संजय काका पाटील यांचे पुत्र प्रभाकर यांचेही स्वागत स्वीकारून ताफा सांगलीच्या दिशेने रवाना झाला.