वाहून गेलेल्या त्या दाम्पत्यापैकी पत्नीचा मृतदेह सापडला! एनडीआरएफची आत्तापर्यंत २२ तास शोध मोहिम
रक्षाविसर्जना कार्यक्रम करून परतत असताना मुलगी व जावई यांच्यावर काळाचा घाला
तासगाव प्रतिनिधी
जुना सातारा रस्त्यावरील तुरची हददीतील येरळा नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुचाकीसह वाहून गेलेल्या दाम्पत्यापैकी पत्नीचा शोध तिसऱ्या दिवशी लागला. मात्र पतीचा शोध लागलेला नाही. हे दाम्पंत्य सातारा जिल्हयातील आहे. तर रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम करून गावी परतत असतानाच काळाने मुलगी व जावई यांच्यावर काळाने घाला घातला आहे. हे दाम्पंत्य बेपत्ता असल्याची नोंद तासगांव पोलिसात असून बुधवारी पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर एनडीआरएफ टीमची आत्तापर्यंत सुमारे 22 तास शोध मोहित राहिली आहे.
20 तासांच्या शोध मोहिमेनंतर पत्नीचा मृतदेह सापडला.
मंगळवारी सकाळी 8 च्या दरम्यान पुन्हा एनडीआरएफ टीमने दोन बोटीच्या साह्याने तांदळे वस्ती पूल ते निमणी येथील येरळा नदी पुल या सुमारे साडे तीन कि.मी.मध्ये सायंकाळी 6.30 पर्यंत शोध मोहिम सुरू होती. सोमवारी व मंगळवारी शोध घेतल्यानंतरही शोध लागला नाही. बुधवारी 20 तासानंतर पत्नीचा मृतदेह सापडला.
बुधवारी सकाळी 8 पासूनच एनडीआरएफ टीमची शोध मोहिम सुरू होती. दुपारी 4 च्या दरम्यान तांदळेवस्ती येथील येरळा नदीच्या पुलापासून सुमारे 500 ते 1000 फुटावर असलेल्या जॅकवेलजवळ पाण्याच्यावर किंचितसा हाताचा भाग वर दिसला, हे काय पाहण्यासाठी एनडीआरएफ ची टीम त्या दिशेने पोहचली,त्यावेळी तो हाताच असल्याची खात्री झाली. अधिक शोध घेतला असता त्या महिलेच्या अंगावर संपूर्ण कचरा साचला होता. पण एनडीआरएफ टीमच्या कौशल्याने केवळ किचिंतशा हाताच्या भागावरून शोध घेता आला.
तासगावातील भिलवडी नाका येथील विकास गोविंद माने यांनी मंगळवारी तासगांव पोलीसात तक्रार दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, माझे साडू दत्तात्रय उत्तम पवार-50 व मेव्हुणी सौ. रेखा दत्तात्रय पवार-47 रा.पिंपवडी बुद्रुक ता.कोरेगांव जि.सातारा हे दि.24 ऑगस्ट रोजी सासु इंदुबाई बबन फडतरे रा.वरचे गल्ली,तासगांव या मयत झाल्याने त्यांच्या अंत्यविधी करीता आले होते. दि. 26 ऑगस्ट रोजी रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम आवरून दुपारी 2.15 च्या दरम्यान ते तासगांव येथून गावाकडे जाण्यासाठी गेले. ते रात्री उशीरा पर्यंत गावी न पोहचल्याने तसेच पलूस, कराड, येथील नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर ही शोध न लागल्याने ते कोठेतरी बेपत्ता झाले असावेत असे ही यामध्ये म्हंटले आहे.
रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम करून जातानाच मुलगी व जावईवर काळाचा घाला.
सौ.रेखा दत्तात्रय पवार यांचे माहेर तासगांव असून त्यांच्या आईंचे निधन झाल्याने त्या आपल्या पतींसमवेत अंत्यविधीसाठी आल्या होत्या. तर मंगळवारी रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम करून आपल्या गावी जात असतानाच मुलगी व जावई यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे..
आज ही शोध मोहिम सुरू राहणार...
तांदळेवस्ती येथील पुलावर तसेच निमणी येरळा पुलावर वाहून गेलेल्या दाम्पंत्यांचे कुटुंबिय तसेच नातेवाईक थांबून होते. सर्वांच्याच नजरा शोध घेणाऱ्या एनडीआरएफ टीमकडे लागून होत्या पण बुधवारी उशीरापर्यंत दत्तात्रय पवार यांचा शोध लागला नाही. त्यामुळे गुरूवारीही शोध मोहिम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.