गणेश मंडळांना खूषखबर! यावर्षीपासून खड्डे, स्टेज व स्वागत कमानींचे शुल्क माफ
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांचे गणेश मंडळांना गिफ्ट
प्रतिनिधी मिरज
सांगली मिरजेतील सार्वजनिक गणेश मंडळांना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आनंद वार्ता दिली आहे. प्रतिवर्षी गणेशोत्सवासाठी घालण्यात येणाऱ्या स्टेज व स्वागत कमानींसाठी महापालिकेला द्यावे लागणारे पैसे यावर्षीपासून माफ करण्यात आले आहेत. खड्डे व स्टेजच्या महसूल आकारणीतून महापालिकेला काही प्रमाणत उत्पन्न मिळते. मात्र लोकवर्गणी काढून गणेशोत्सव करणाऱ्या मंडळांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी गणेश मंडळांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूष करण्यासाठी यावर्षीपासूनच मंडळाचे स्टेज व स्वागत कमानींच्या शुल्क आकारणीतून मंडळांना मुक्ती मिळवून दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांकडून समाधान व्यक्त होत आहे.
मिरजेच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुमारे साडेतीनशेहुन अधिक मंडळाकडून बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आहे. प्रतिवर्षी या सार्वजनिक मंडळाकडून महापालिका शुल्क आकारत होती. प्रती खड्ड्यासाठी 60 रुपये आणि स्टेजचा आकारमानानुसार दर आकारणी केली जात होती. त्यामुळे सार्वजनिक मंडळे वर्गणी काढून महापालिकेला कर भरत होते. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ सांगली जिल्ह्यातील सांगली व मिरज शहरातच अशाप्रकारे शुल्क आकारणी होत असल्याची तक्रार गणेश मंडळांनी केली होती. याबाबत विविध हिंदुत्ववादी संघटनांनीही महापालिकेकडे पाठपुरावा करून तसेच शांतता कमिटीच्या बैठकीत ही वेळोवेळी आवाज उठवला होता. याबाबत पालकमंत्री सुरेश खाडे यांनाही साकडे घातले होते.
पालकमंत्री सुरेश खाडे सर्व मंडळांना खड्डे व स्टेज आकारणी शुल्क माफ करण्याच्या विषयावर आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्तांनीही हा प्रस्ताव मान्य करून यंदापासून गणेश मंडळांना शुल्क माफ करण्यास अनुभूती दर्शवली आहे. पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाला पत्र देऊन शुल्क आकारणी बंद करावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सर्व गणेश मंडळांनाही यावर्षी खड्डे व स्टेजसह स्वागत कमानीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क महापालिकेला भरू नये असे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे गणेश मंडळांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.