Sangli News : तुळजाभवानी यात्रेसाठी सांगलीच्या 65 बसेस रवाना !
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ
सांगली : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. दि. ६ व ७ ऑक्टोबर हे यात्रेचे मुख्य दिवस असून, या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेशातून लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरात दाखल होत आहेत. वाढत्या गर्दीमुळे तुळजापूर आगारावर वाहतूक व्यवस्थेचा ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी सांगली विभागाने एकूण ६५ जादा एस.टी. बसेस तुळजापूरकडे रवाना केल्या आहेत.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलदेवी मानली जाते. प्रत्येकवर्षी नवरात्रीच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी तुळजापूरात गर्दी करतात. यंदाही यात्रेचा उत्साह ओसंडून वाहत असून, मंदिर परिसरात धार्मिक विधी, आरत्या, पालख्या आणि भजन कार्यक्रमांची रेलचेल आहे.
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सोलापूर विभागाने सांगली विभागाकडे जादा बसेसची मागणी केली होती. त्यानुसार सांगली विभागातील दहा आगारांतून रविवारी ६५ बसेस तुळजापूरसाठी रवाना करण्यात आल्या. या बसेस यात्रेच्या कालावधीत तुळजापूर आगारातून भाविकांसाठी सेवा बजावतील. या जादा बसेस १० ऑक्टोबरपर्यंत कार्यरत राहणार आहेत.
यात्रेदरम्यान तुळजापूरकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गांवर वाहतुकीची प्रचंड गर्दी असल्याने एस.टी. महामंडळाने प्रवाशांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी विशेष नियोजन केले आहे. तुळजापूर आगारातील कर्मच्चायांना अतिरिक्त जबाबद्मया देण्यात आल्या असून, भाविकांच्या सोयीसाठी तिकीट वितरण, थांबे व्यवस्थापन आणि विश्रांती केंद्रांवर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
या संपूर्ण वाहतूक नियोजनाचे मार्गदर्शन सांगली विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी (प्र.) सतीश पाटील आणि सहायक वाहतूक अधीक्षक (चालन) प्रवीण डोंगरे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली विभागातील सर्व आगारांनी समन्वय साधून बसेस तुळजापूरकडे पाठवल्या.