एकमेकांकडे बघण्यावरून युवकाचा निर्घृण खून! मंदिराच्या दारातच कोयते डोक्यात घातले
: सांगली शहर पोलीस अॅक्शनमध्ये : चार दिवसापासून सुरू होता पाठलाग : ताब्यात घेतलेले सर्व पाचजण अल्पवयीन
सांगली प्रतिनिधी
गेल्या नवरात्री उत्सवात एकमेकांकडे बघण्यावरून झालेल्या वादातून जामवाडी येथील मरगुबाई मंदिरासमोरच अनिकेत तुकाराम हिप्परकर वय 22, रा. जामवाडी, सांगली याचा खून चार ते पाच जणांनी केला आहे. यातील दोघांनी अनिकेतच्या डोक्यात कोयता घातला ते दोन्ही कोयते तसेच त्याच्या डोक्यात अडकून पडले होते. सांगली शहर पोलिसांनी तात्काळ यावर अॅक्शन घेत संशयित चार ते पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पण हे चार ते पाचजण अल्पवयीन आहेत. हा खून मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिकेत हिप्परकर आणि त्या परिसरात राहणाऱ्या संशयित पाच ते सहा जणांबरोबर मागील नवरात्री उत्सवात एकमेकाकडे बघण्यावरून वाद झाला होता. हा वाद टोकाला गेला होता. त्यावेळी त्या परिसरातील एका मध्यस्थाने हा वाद मिटविला होता. त्यामुळे हे प्रकरण थंडावले होते. पण त्यानंतर हनुमान जयंतीला पुन्हा एकदा वाद उफाळून आला होता. या वादातूनच गेल्या चार ते पाच दिवसापासून अनिकेतवर या चार ते पाच जणांनी वॉच ठेवला होता. हे अनिकेत ही जाणून होता.
मंगळवारी सायंकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास अनिकेत हा घराजवळून बाहेर पडला त्याचवेळी या मरगुबाई मंदिराजवळ असणाऱ्या कट्यावर दबा धरून बसलेल्या या चार ते पाचजणांनी अनिकेतवर थेट कोयत्याने हल्ला केला. यातील दोघांचे कोयते अनिकेतच्या डोक्यात अडकून पडले. अनिकेतच्या डोक्यात वर्मी घाव लागल्याने तो जागीच कोसळला आणि त्याच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव सुरू झाला. परिसरातील नागरिकांनी याची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली.
सांगली शहर पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पथकासह घटनास्थळी आले त्यांनी परिस्थिती पाहिली आणि अनिकेतचा मृतदेह वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर संशयितांचा शोध सांगली शहर पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाकडून सुरू केला. तासाभरात यातील चार ते पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पण हे अल्पवयीन असल्याने त्याची नावे उघड करण्यात आली नाहीत.
हे भांडण सोडवणाऱ्या मध्यस्थांचाही शोध सुरू
दरम्यान गेल्या नवरात्रीमध्ये मयत अनिकेत आणि जय कलाल याचे मित्र यांच्यात जो वाद झाला होता. तो वाद जामवाडी येथेच एका व्यक्तीने मध्यस्थी करून सोडविला होता. कारण या वादाच्या दरम्यान त्याचा मुलगाही अनिकेत आणि संशयित यांचा मित्र आहे. त्यामुळे त्यांने मध्यस्थी केली होती. पण त्यानंतर हा वाद संपला होता. पण आता गेल्या काही दिवसापासून हा वाद पुन्हा का उफाळला याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच चार दिवसापासून संशयित अनिकेतचा पाठलाग करत आहेत. तर त्यांने याची माहिती कोणाला कशी दिली नाही.
जामवाडी बऱ्याच वर्षांनी रेकॉर्डवर आली
जामवाडी येथे यापूर्वी एक वेगळीच दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे या परिसरात कोणताही खून अथवा इतर अवैध गोष्टी घडत नव्हत्या. पण ज्या ठिकाणी अनिकेतच खून झाला होता. त्याच ठिकाणी 20-25 वर्षापूर्वी असाच खून झाला होता आणि एका गटाची मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे हा खून ही असाच दहशत निर्माण करण्यासाठी झाला आहे का अशी चर्चा सुरू होती. तसेच बऱ्याच वर्षानंतर जामवाडी पुन्हा एकदा रेकॉर्डवर आली आहे.