सांगली महापालिकेला 90 कोटी दंड! प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मोठा दणका! फौजदारी कारवाईची प्रक्रियाही सुरू
स्वतंत्र भारत पक्ष व जिल्हा संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश
सांगली : प्रतिनिधी
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला महानगरपालिकेचे सांडपाणी थेट नदीमध्ये सोडून कृष्णा नदी प्रदूषित केल्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ९० कोटीचा दंड ठोठावला आहे अशी माहिती याचिकाकर्ते सुनील फराटे, आर्कि. रविंद्र चव्हाण, तानाजी रूईकर, सतीश साखळकर, अॅड. आसिफ मुजावर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कृष्णा नदी मध्ये २०२२ च्या जुलै व ऑगस्ट महिन्यात लाखोंच्या संख्येने मासे मृत नदीमध्ये आढळून आले होते, व मासे मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्यासाठी व नदीचे पदूषण रोखण्यासाठी हरित न्यायालय पुणे येथे सुनील फराटे, स्वतंत्र भारत पक्ष यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये हरित न्यायालयाने चौकशी समिती नियुक्त करून अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार काही साखर कारखाने व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांना दोषी ठरविण्यात आलेले होते. न्यायालयाने दंडाची रक्कम आकारणी करून निश्चित करण्यात यावी असे आदेश दिलेले होते. त्यानुसार काही कारखान्यांना दंड थोटाविण्यात आलेला होता. आता आयुक्त, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांना महानगरपालिकेचे सांडपाणी थेट नदीमध्ये सोडून कृष्णा नदी प्रदूषित केल्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दि. १७.फेब्रुवारी रोजी नोटिसीद्वारे रु. ९० कोटी दंड ठोठावला असून तो १५ दिवसांच्या आत भरण्याचे आदेश दिलेले आहेत.
तसेच दि. १५ रोजीच्या सुनावणी मध्ये कृष्णा नदी प्रदूषण केल्याबाबत थेट आयुक्त, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकिलांनी न्यायालयासमोर म्हणणे सादर केले आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे सतत नोटिसा काढून देखील सुनावणी सुरू असलेल्या दिवशी देखील महानगरपालिकेचे सर्व सांडपाणी विनाप्रक्रिया कृष्णा नदीमध्ये सोडत असल्याचे याचिकाकर्ते यांचे वकील ओंकार वांगीकर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना "प्रक्रिया न केलेले सांडपाणी कृष्णा नदी मध्ये सोडले जाणार नाही याची दक्षता देण्यात यावी" असे आदेश दि. १५.०२.२०२४ रोजी न्यायालयाने दिले आहेत. अशी माहितीही सुनील फराटे, आर्कि. रविंद्र चव्हाण, तानाजी रूईकर, सतीश साखळकर, अॅड. आसिफ मुजावर यांनी पत्रकार परिषदेत दिली.