महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांगली जिल्ह्यात जुगाड आघाडी! कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे झुकत नेत्यांनी महायुती, महाआघाडी मोडली!

11:28 AM May 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sangli Miraj Pattern
Advertisement

शिवराज काटकर / सांगली

कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आणि आम्ही म्हणू त्याच उमेदवाराचे काम करायला होकार द्या असा दबाव टाकत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी नेत्यांना झुकवले. होय...नाही करत आपापले आदेश मागे घेत प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी महायुती आणि महाआघाडी तोडून जुगाड आघाडीला मान्यता दिली. मंगळवारी झालेल्या मतदानातून हेच दिसून आले आहे. आता मतदार राजा ईव्हीएम मशीन मधून कोणता अविष्कार साधतो? हे समजायला महिनाभर थांबावे लागणार आहे.

Advertisement

सांगली लोकसभेचा निकाल कसा लागेल याचा मात्र बराच अंदाज लोकांनीच समोर ठेवलेला आहे. त्याबद्दल उघड भाष्य करण्याचीही आवश्यकता नाही. मंगळवारचा दिवस उजाडला त्यावेळी ज्यांचे चेहरे उत्साहाने फुललेले असायला पाहिजे होते ते उतरलेले होते आणि ज्यांचे उत्तरलेले असतील असे वाटत होते ते मतदार खेचून आणण्याच्या चढाओढीत होते. रात्रीत आणि अलीकडच्या दोन-चार दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या आणि नेत्यांनी वेगवेगळे संदेश पोहोचवून आपल्या कार्यकर्त्यांना हैराण केल्याचे निदर्शनास आले. पलूस- कडेगाव तालुक्यात सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये फारच गोंधळ असल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसातील नेत्यांचे वेगवेगळे आदेश पळताना विविध संस्थातील नोकरदार, राजकीय कार्यकर्ते मात्र वैतागून गेले. जत, तासगाव, कवठेमंकाळ आणि पलूस- कडेगाव या मतदारसंघांमध्ये कमालीच्या गोंधळाचे वातावरण होते.

Advertisement

तरीही सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रभावी नेत्याला आपल्या म्हणण्याप्रमाणे कार्यकर्त्यांकडून मतदान करून घेता आलेले नाही. मतदार संघात सगळे विचार कार्यकर्त्यांच्या दबावापुढे संपुष्टात आल्याचे दिसले. पुरोगामी म्हनवणाऱ्यांनी प्रतिगाम्यांना मतदान करण्यासाठी कार्यकर्त्यांना आग्रह केला तर प्रतिगामी म्हणवणाऱ्यांनी पुरोगामी म्हणवणाऱ्या उमेदवाराला चाल देण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले. विशेष म्हणजे हे सगळे गुपचूप झाले. रात्रीत बदलणारे मोठे मोठे नेते, त्यांची स्टेजवरील डरकाळी आणि प्रत्यक्षातील कृती प्रचंड विसंगत असल्याचे लोकांनाही समजले. अनेकांनी नेत्यांच्या आदेशाचे जू मानेवर ठेवायचे यापुढे कायमचे झुगारून देण्याचे ठरवले.

सांगली शहरातील मतदानाच्या सुरुवातीला अनेक केंद्रांवर लोकांची गर्दी पाहायला मिळाली. कुणाचा त्रास सुरू होण्यापूर्वी मतदान करून जाण्यासाठी अनेक जण उत्सुकतेने आले होते. आणि केंद्रांवर सेल्फी पॉईंट न दिसल्याने काहींची नाराजी दिसून आली तर मतदारांना मोबाईल केंद्रात घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने पुन्हा केंद्रातून बाहेर गाडीत मोबाईल ठेवण्यासाठी लोकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या आणि त्यामुळे पोलीस व सरकारी कर्मचाऱ्यांशी वादाच्या घटना घडत होत्या. हळूहळू हा प्रकार सरावाचा होत गेला. तासगाव तालुक्यात सर्व राजकीय पक्षांचे आणि पत्रकारांचे सुद्धा लक्ष लागले होते. इथले अनेक नगरसेवक बुथवर नसल्याची चर्चा होती. तालुक्यातील निमणी शेजारी असणाऱ्या नेहरूनगर येथील मतदान केंद्राबाहेर सावलीत बसून तीन लोक लोकांना मतदान कसे करायचे हे शिकवत होते. पोलिसांनी त्यांना हटकले तेव्हा डमी मतदान यंत्र घेऊन पळणाऱ्या मंडळींना पाठलाग करून पकडण्यात आले. मतदान केंद्रावर तणाव नको म्हणून तातडीने पोलिसांनी त्यांना तासगावला पाठवले. मतदान केंद्रांवर अत्यंत तुरळक गर्दी दिसून आली.

सांडगेवाडी आणि आसपासच्या काही गावांमध्ये लोकांची वर्दळ होती मात्र पलूस शहरात दुपारची वेळ सुस्तावण्याची आणि लोक उन्हापासून बचावासाठी बाहेर पडत नसल्याचे दाखवणारी होती. पाहायला मिळाली. मात्र इथे ेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांनी आपल्या सोयीच्या भूमिका घेतल्याचे आणि या भूमिका रात्रीत दोनदा बदलल्याचे सांगितले जात होते. नेत्यांच्या आदेशाची आणि त्यांनी तो का दिला यावर ज्या कारणांची खुमासदार चर्चा संपूर्ण गावात होती. जोतिबाच्या यात्रेच्या निमित्ताने उधळलेला गुलाल अशी उधळण का झाली असा प्रश्न निर्माण करत होता. मात्र जागृत लोक यात्रेची माहिती आवर्जून देत होते. कडेगाव तालुक्यात अत्यंत शांततेने मतदान सुरू होते. आश्चर्य म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी एकाच ठिकाणी सावलीत उभे राहून लोकांनाच अंदाज विचारत होते. जनतेचा कानोसा नेते घेत आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांना टाळून लोक थेट मतदान केंद्रात रांगा लावत होते. सरकारी मतदान स्लीप प्रत्येकाच्या घरी पोहोच झालेली असल्याने लोकांना कोणत्याही बुथवर जाण्याची गरज भासत नव्हती. सायंकाळी चार नंतर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये लोक बाहेर पडून मतदानाला रांग लावू लागले. त्यामुळे 40 टक्क्यांच्या पुढे आकडेवारी सरकत अखेर अनेक गावांमध्ये ती 60, 70% पर्यंत पोहोचलेली दिसून आली. अनेक गावातील कार्यकर्त्यांनी मतदान संपल्या संपल्या आपल्या एकूण मतदान झालेले मतदान आणि आकडेवारी समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. याबाबत एका कार्यकर्त्याला विचारल्यानंतर त्याने आमच्या गावाचा आकडा उद्या आयोगाकडून वाढायला नको म्हणून आताच तो जाहीर करून ठेवतोय अशी मार्मिक प्रतिक्रिया त्याने दिली.

5 जून साठी हेलिकॉप्टर बुक
कडेगाव तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, सांगली लोकसभेला विजयी होणाऱ्या उमेदवाराला आपल्या पक्षाचे नेते तात्काळ मुंबईला घेऊन जाणार आहेत त्यासाठी पाच जून रोजीचे हेलिकॉप्टर आताच बुक केले आहे. या हेलिकॉप्टरचा पायलट मात्र खाजगी कंपनीचा असणार आहे.

भावा भावांची ताटातूट
जिल्ह्याच्या राजकारणात कोण कोणाच्या बाजूने राहायचे यावरून दोन राजकीय क्षेत्रातील मोठ्या भावांमध्ये वाद निर्माण झाल्याचे आणि दोघांनी दोन गटांचे काम करून वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचे मंगळवारी लक्षात आले. आपण पक्षाचेच काम करणार असे धाकट्या भावाने ठरवले तर आपण उट्टे काढणार असे थोरल्या भावाने ठरवले. सायंकाळी मतदानानंतर भेटलेले कार्यकर्ते मात्र या प्रकाराबद्दल हळूहळू व्यक्त करत होते.

आता निधी आमच्याकडेच पाठवा
अपेक्षित नसतानाही खासदारांचा प्रचार केलेल्या एका नेत्याचे आभार मानण्यासाठी खासदारांचे तीन दुत संबंधित नेत्यांना भेटण्यासाठी धडकले. नेत्यांनी आपल्या पक्षाच्या नगरपंचायतीच्या अध्यक्षांकडे हात करून त्यांना तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे, असे सांगितले. तसे नगराध्यक्ष भैया म्हणाले, खासदारांनी गेल्या वेळी आमच्यासाठी निधी दिला पण पैसे वर्ग केले पीडब्ल्यूडीकडे. आम्ही एक पै वापरली नाही. आता यापुढे चूक सुधारा आणि आमचा निधी आमच्या नगरपंचायतीच्या खात्यावर पाठवा... नेत्यांनी समोरच उट्टे काढल्याने तिन्ही दूत खजिल झाले.

पत्त्याचे कॅट घेऊन जेलमध्ये जातो
दुष्काळी तालुक्यात प्रचारात हिरीरीने सहभागी झालेल्या एका नेत्याला दुसऱ्या नेत्यांनी छेडले. आता काम केले, बरे वाटले असेल. उद्या चौकशी लावतील तेव्हा कळेल. वैतागलेल्या नेत्याने उत्तर दिले, जाताना तुमचे आणि चौघांचे नाव घेतो म्हणजे तुम्हालाही जेलमध्ये नेतील दोन पत्त्यांचे कॅट घेऊन जाऊ. सोडत नाही तोपर्यंत पत्ते खेळत बसू. लोकांना ही किंमत कळेल आपण नसलो की कोणी काम करत नाही हे लक्षात येईल.

 

Advertisement
Tags :
Sangli Loksabha Constituencytarun bharat news
Next Article