Sangli Breaking : सांगली हवी तर एकास एक आणि तोडीचा उमेदवार हवा ! विलासराव जगताप यांनी संजय राऊत यांना दिला सूचक सल्ला
माजी आमदार विलासराव जगताप यांचा खा. संजय काकांना विरोध कायम
जत, प्रतिनिधी
सांगलीची जागा महाविकास आघाडीला जिंकायची असल्यास एकास एक आणि तोडीचा उमेदवार द्यावा तरच चित्र वेगळे दिसेल, असे स्पष्ट मत माजी आमदार विलासराव जगताप यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासमोर व्यक्त केले. शिवाय आपला विद्यमान खासदार संजय काका यांना विरोध कायम आहे, पण तोडीचा उमेदवार नसेल तर आम्हालाही विचार करावा लागेल असे देखील जगताप यांनी राऊत यांना सांगितले.
खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेले भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा खा. संजय राऊत यांनी शुक्रवारी रात्री उशिरा भेट घेतली. या भेटीमुळे भाजपसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. विलासराव यांनी आपली भूमिका जाहीरपणे व्यक्त केली नाही. मात्र, संजय पाटील यांच्या समोर सक्षम पर्याय द्यायला हवा, असा सूचक सल्ला ही त्यांनी संजय राऊत यांना दिला.
यावर खा. राऊत यांनीही लवकरच योग्य निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडाली आहे. सांगली लोकसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीत जोरदार घडामोडी घडताना दिसत आहेत. याचा आढावा व प्रत्येक तालुक्यात पधादिकारी यांच्या भेटी घेण्यासाठी खा. संजय राऊत तीन दिवस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी खा. संजय पाटील यांच्यावर नाराज असलेले अजितराव घोरपडे यांची कवठेमहांकाळ येथे भेट घेतली. यानंतर त्यांची गाडी शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता थेट जत येथे आली .
दरम्यान, रात्री उशिरा भाजपच्या वरिष्ठ मंडळीवर नाराज माजी आ. विलासराव जगताप यांची जतमध्ये त्यांच्या राहत्या घरी भेट घेत राजकीय चर्चासह भोजनाचा अस्वाद घेतला. खा. राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मदत करण्यासाठी विलासराव यांच्या सोबत चर्चा केली . या भेटीत खा. संजय पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील भाजपच्या अनेक नेत्यांची फसवणूक केली आहे. त्यांनी इतर पक्षाच्या नेत्यांना मदत केली. त्यामुळे कडेगाव, आटपाडी, विटा, कवठेमहांकाळ, जत या दुष्काळी फोरम मधून संजय पाटील यांना तीव्र विरोध आहे. मात्र, पक्षाने कोणत्याही मतदार संघातील नेत्यांना विश्वासात न घेता त्याची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांचा पराभव करायचा असेल तर सक्षम व सहा मतदार संघात त्याची ताकद लागेल, असा उमेदवार द्यायला हवा, असा सल्ला विलासराव जगताप यांनी खा. संजय राऊत यांना दिला.
दरम्यान, या बैठकीत जगताप म्हणाले, सांगली जिल्ह्यात मी चाळीस वर्षापासून राजकारण व समाजकारण करत आहे. जिल्ह्यातले प्रस्थापित नेते आपापल्या परीने सोयीचे राजकारण करतात. वापरा आणि फेका ही त्यांची निती आहे. आपण जाहीर पत्रकार परिषद घेतल्यानंतरच विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारासाठी जोर लावला आहे. तडजोड आणि विश्वासघातकी राजकारण करण्यात इथल्या जिल्ह्यातले बडे नेते माहीर आहेत. त्यामुळे आपण या जागेसंदर्भात योग्य तो अभ्यास करून घ्यावा. जर आघाडीत एकमत होत नसेल आणि तिढा सुटत नसेल तर आम्हालाही विचार करावा लागेल. सांगली हवी तर मग एकास एक आणि तोडीचा उमेदवार हेच समीकरण वापरावे लागेल असेही जगताप म्हणाले.
तसेच स्व. वसंतदादा यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला खूप मोठी मदत केली आहे. पण आज त्यांचे नातू विशाल पाटील यांनाच शिवसेना कॉर्नर करत आहे, याचा एक वेगळा संदेश ही जिल्ह्यात पसरत असल्याचे जगताप यांनी रोखठोकपणे राऊत यांना बोलून दाखवले. शिवाय सांगली जिल्ह्यात आठ तालुके व सहा मतदार संघ येतात. या सर्व ठिकाणी आपली यंत्रणा सक्षमपणे राबणे, कार्यकर्त्यांची नेटवर्क, एकसंघपणा, बूथचे नियोजन अशा निवडणुकीतील सर्व खूबींचा वापर अतिशय ताकदीने होणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट भूमिका जगताप यांनी खा. राऊत यांच्यासमोर मांडल्याचे सांगण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील, शिवसेनेचे दिगंबर जाधव, जिल्हाध्यक्ष संजय विभुते, बजरंग पाटील, शंभूराजे काटकर, सागर पाटील, अमित दुधाळ, विजयराजे चव्हाण, संग्राम भैय्या जगताप, आण्णा भिसे, संतोष मोटे, आप्पा शिंदे, यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी जमली होती.
दुष्काळी जनतेला न्याय देण्यास सरकार अपयशी.....!
जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर खा. संजय राऊत यांना विचारले असता, आम्ही सीमा भागात अनेक वर्षे लढा देतोय. दुसरीकडे जत तालुक्यातील वंचित ६५ गावातील जनतेने पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याचा इशारा देताहेत. ही बाब दुर्दैवी असून यामध्ये देशातील व राज्यातील सरकार साफ अपयशी ठरले आहे. त्यांना दुष्काळी जनतेशी कोणतेही देणे घेणे नाही. दहा वर्षे मोदी सरकार सत्तेत आहे. दुष्काळी जनतेला न्याय देण्याऐवजी सत्तेचा वापर करून पक्ष फोडने, इतकाच कार्यक्रम यांनी राबविला, असा टोला ही त्यांनी लागवला.