शिजवायंच आम्ही आणि वाढायचं दुसऱ्याच्या ताटात- पृथ्वीराज देशमुख
गेल्या पाच वर्षात भाजपा खासदारांचा एक कार्यक्रम दाखवा मी घरात बसतो : भाजपच्या बैठकीत पृथ्वीराज देशमुख यांची खदखद
पलूस प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षात पलूस-कडेगाव मतदार संघामध्ये भाजपा खासदारांचा एक कार्यक्रम झाला असला तर मी घरात बसतो. जे कार्यक्रम झालेत ते वेगळया पक्षासोबत झालेत. भाजपाच्या कार्यकर्त्यानी निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करायचे आणि निवडून आल्यावर इतर पक्षाने मदत केली म्हणत त्यांच्यासोबतच कार्यक्रम घ्यायचे हे म्हणजे शिजवायच आम्ही आणि वाढायचं दुसऱ्याच्या ताटात असा प्रकार आहे अशा शब्दात भाजपाचे नेते पृथ्वीराज देशमुख यांनी मनातील खदखद पलूस येथे व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली लोकसभा मतदार संघातील पलूस- कडेगाव विधानसभा मतदार संघातील बूथप्रमुख संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी देशमुख बोलत होते. संमेलनामध्ये येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी प्रचार करण्याचा निर्धार सर्वांनी केला.
यावेळी बूथप्रमुख संमेलन कामगार मंत्री व पालकमंत्री सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र लोकसभा प्रमुख शेखर इनामदार, जिल्हा भाजपा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, जिल्हा लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक शिंदे, जिल्हा लोकसभा विस्तारक प्रकाश बिरजे, पलूस कडेगाव विधानसभाग प्रमुख संग्राम देशमुख यांची उपस्थिती होती. देशमुख पुढे म्हणाले, मी जिल्हाध्यक्ष होतो, संग्रामसिंह देशमुख जि. प. अध्यक्ष असताना आम्ही पक्षाच्या कामात कुठे कमी पडलो नाही, परंतु पक्षाने विधानसभेला येथील जागा शिवसेनेला दिली आणि आम्हाला थांबावे लागले. शिवसेनेला सहा हजार मते पडली आणि वीस हजार मते नोटाला पडली. सदरचा उमेदवार मोठया संख्येन निवडून आला. तरीही नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व तुमच्याकडे पाहून आम्ही भाजपाचे एकनिष्ठेने काम करतोय. लोकसभेला आम्ही तुम्हाला तिकीट देणार नाही हे जर आम्हाला अगोदर सांगितले असते तर आम्हाला व पक्षाला काही अडचण नव्हती. संघटना ही संघर्षातून उभी राहिली आहे. कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.
गेल्या लोकसभा निवडणूकीत तन मन धनाने काम केले अकार हजार मताने हा मतदारसंघ कमी पडला आणि खासदारांनी सांगायच आम्हाला दुसऱ्या पक्षाने मदत केली. जर तुम्ही अशा पध्दतीने बोलत असाल तर कार्यकर्त्यामध्ये उत्साह राहणार नाही. आज जेष्ठ नेते विलासराव जगताप यांना पक्षातून काढून टाकण्याची भाषा बोलली जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रकाश गडळे, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संजय येसुगडे, उपाध्यक्ष राजेंद्र लाड, ज्येष्ठ नेते शिवाजीनाना मगर पाटील, सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्तू शेठ अण्णा सूर्यवंशी, पलूस तालुका भाजपा अध्यक्ष मिलिंद पाटील, कडेगाव तालुका भाजपा अध्यक्ष अशोक साळुंखे, पलूस तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनीताई ब्रम्हे, पलूस तालुका संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष सर्जेराव नलावडे, जिल्हा भाजपा युवा मोर्चा माजी अध्यक्ष रोहित पाटील, पलूस तालुका भाजपाध्यक्ष विजयकाका पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विशाल चव्हाण, युवामोर्चा पलूस शहर अध्यक्ष रोहित पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत होती.