Sangli Left Canal: डावा कालवा म्हणजे 'असून अडचण नसून खोळंबा', पूल कमानीला भगदाड
करूंगली गावाजवळूनच वारणा डावा कालवा गेला आहे
By : भरत गुंडगे
वारणावती : शिराळा पश्चिम भागाला वरदान ठरलेला वारणा डावा कालवा 'असून अडचण नसून खोळंबा' अशी अवस्था झाली आहे. कालव्यावरील पुलांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून करूंगली-गुंडगेवाडी येथील पुलाचा कालव्याच्या मध्यभागी असलेला दगडी बांधकामाचा पिलरचा काही भाग कोसळला आहे.
याबाबत संबंधित विभागाला वारंवार सांगून देखील विभागाचे दुर्लक्ष होत आहे, फुल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थ व वाहनचालकांतून होत आहे. पूल कोसळून मोठी घटना होण्याआधी पुलाची पाहाणी करून पुलाची नव्याने उभारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांमधून होत आहे.
शिराळा पश्चिम भागातील करूंगली गावाजवळूनच वारणा डावा कालवा गेला आहे. या वारणा डाव्या कालव्यावरून गुंडगेवाडी गावाला जाण्यासाठी हा एकमेव जवळचा मार्ग आहे. याच मार्गे गुढे पाचगणी पठारावर व तिथून पुढे कराड व पाटण तालुक्याला जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते.
करूंगली गावची वीस टक्के शेती पुलाच्या पलीकडे आहे. त्यामुळे कालव्यावरील पुलावरून शेतकऱ्यांची रहदारी सुरू असते. गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाची दुरवस्था झालेली आहे. पुलावरील संरक्षण पौल गायब झाले आहेत. पुलाच्या मधील दगडी भिंतीला भगदाड पडले असून दगड ढासळू लागली आहेत. तर एका बाजूने पुलाचा भरावही ढासळू लागला सतत आहे.
यामुळे पुलावरून अवजड वाहनांना ये-जा करण्यास मनाई करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत सेवा सोसायटी चेअरमन विलास पाटील म्हणाले, पुलाच्या नुतनीकरणासाठी संबंधित विभागांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत.
पूल धोकादायक बनत चालले असून कालव्याला बारा महिने पाणी सुरू असल्याने पुलाचा भराव ढासळत चालले आहे. संबंधित विभागाने पुलाची पाहणी करुन पुलाची नव्याने उभारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.