कुपवाडमध्ये 300 कोटींचे 140 किलो ‘मेफेड्रॉन’ घातक ड्रग्जसाठा जप्त
कुपवाड प्रतिनिधी
पुणे व सांगली पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी पहाटे कुपवाडमधील स्वामी मळ्यातील एका ठिकाणच्या भाड्याने घेतलेल्या खोलीत छापा टाकून तब्बल 280 ते 300 कोटी रूपये किंमतीचा 140 किलो वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) नावाचा घातक अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे.
या कारवाईने सांगली जिह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली असून या अंमली पदार्थाचे पुणे ते कुपवाड कनेक्शन असल्याचे या कारवाईच्या निमित्ताने उजेडात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी मुख्य सुत्रधाराला अटक कऊन अन्य दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ड्रग्जची वाहतूक करणारा मालवाहू टेंपोही जप्त केला आहे. हा ड्रग्जचा साठा करण्यासाठी संशयितांनी 15 दिवसांपुर्वी स्वामी मळ्यातील एकाच ठिकाणी दोन खोल्या भाडे तत्वावर वापरासाठी घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
यामध्ये मुख्य संशयित आयुब अकबरशहा मकानदार (44, रा. बाळकृष्णनगर, कुपवाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर संशयित रमजान हमीद मुजावर (55, रा. नुरइस्लाम मज्जिद जवळ, कुपवाड) व अक्षय चंद्रकांत तावडे (30, रा. बाळकृष्णनगर, कुपवाड) या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ड्रग्जची वाहतूक करणारा मालवाहू टेंम्पो (क्रमांक- एम. एच. 10. ए.क्यु.-7642) जप्त करण्यात आल्याची माहिती पुणे क्राईम बँचचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, यातील मुख्य संशयित आयुब मकानदार याला आठ वर्षापुर्वी पुणे येथे एमडी ड्रग्जचा बेकायदा पुरवठा करताना रंगेहाथ पकडून अटक केली होती. येरवडा कारागृहात तो शिक्षा भोगत होता. जुलै 2023 मध्ये तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर या कारवाईमुळे तो पुन्हा याच प्रकरणात दुसऱ्यांदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई अद्याप पूर्ण झाली नसून याप्रकरणी आणखी धागेदोरे सापडण्याची शक्यता व्यक्त कऊन यात आणखी कोणाचा समावेश आहे का? याबाबत सखोल चौकशी सुऊ असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
निरीक्षक गायकवाड म्हणाले, पुणे पोलिसांनी 19 फेब्रुवारी रोजी पुणे येथील करकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अर्थकेम कारखान्यात छापा टाकून 600 किलो मेफेड्रोन अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. या कारवाईत पोलिसांनी कारखाना मालक साबळे यांसह पाचजणांना यापूर्वी अटक केली होती. पथकाने याप्रकरणी दिल्ली, मुंबई, मीरा-भाईदर, बंगळुऊ, हैद्राबाद याठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
या तपासाच्या अनुशंगाने पुणे पोलिसांचे एक पथक सांगलीत दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने बुधवारी पहाटे सांगली पोलिसांच्या मदतीने कुपवाडमधील आयुब मकानदारने भाडेतत्वावर घेतलेल्या स्वामी मळ्यातील एका खोलीत छापा टाकला. या छाप्यात खोलीत मिठाच्या पाकीटात लपवलेला तब्बल 140 किलोचा एमडी अंमली पदार्थाचा साठा पथकाच्या हाती सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत अंदाजे 280 ते 300 कोटी ऊपये होत असल्याचे सांगण्यात आले. या पथकाने संशयित आयुब मकानदारच्या घरावर छापा टाकून पहाटे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर स्वामी मळ्यात कारवाई करण्यात आली. बुधवारी दिवसभर कारवाई सुरू होती.
खोलीत सापडलेल्या मिठाच्या पाकीटाची तपासणी केली असता त्यात एमडी ड्रग्ज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मकादारला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयित आयुब मकानदार याची पुण्यातील काही ड्रग्ज माफियांची जुनी ओळख होती. या ओळखीतून आयुबने त्यांच्या संपर्कात राहून ड्रग्ज माफियांच्या मदतीने एका टेंपोतून कुपवाडमध्ये ड्रग्जचा साठा केल्याचे तपासात समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी आणखी सखोल चौकशी कऊन यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबत तपास सुऊ असल्याचे निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले. यावेळी मिरज विभागीय पोलीस उपाधिक्षक प्रणिल गिल्डा, सांगली स्थानिक गुन्हे अन्वेशनचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाडचे सपोनि अविनाश पाटील उपस्थित होते.