जामवाडी येथील युवकाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक; चार अल्पवयीनांचा समावेश
वादातूनच काटा काढल्याचे स्पष्ट
सांगली प्रतिनिधी
गेल्या नवरात्री उत्सवात एकमेकांकडे बघण्यावरून झालेल्या वादातून जामवाडी येथील मरगुबाई मंदिरासमोर पटेल चौक व्यायाम मंडळाचा कबड्डी खेळाडू अनिकेत तुकाराम हिप्परकर वय 22, रा. जामवाडी, सांगली याचा मंगळवारी सायंकाळी खून करण्यात आला होता. याप्रकरणी मंगेश उर्फ अवधूत संजय आरते वय 27, रा. मरगुबाई मंदिराजवळ जामवाडी सांगली आणि जय राजू कलाल वय 18 रा. उदय मटण शॉपजवळ, जामवाडी सांगली या दोघांना अटक केले आहे. तर इतर चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी निरीक्षण गृहात केली आहे. मयत अनिकेतचा भाऊ संकेत हिप्परकरने याबाबत फिर्याद दिली आहे.
दोन ते तीन वेळा झालेल्या भांडणाचा रागच या खूनातून काढण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या पाच ते सहा जणांनी अनिकेतचा गेम करण्याचा निर्णय चारच दिवसापूर्वी घेतला होता आणि त्यातूनच मंगळवारी सायंकाळी अनिकेतचा गेम मरगुबाई मंदिराजवळ करण्यात आला. त्यानंतर सांगली शहर पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी संशयितपाच ते सहा जणांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार यातील आरते आणि कलाल सोडून इतर चारही जण अल्पवयीन आहेत. त्यामुळे आरते आणि कलला या दोघांना अटक केली आहे. तर इतर चौघांना निरीक्षण गृहात पाठविले आहे.
खून होण्याचे कारण
मयत अनिकेत आणि संशयित सहा जण जामवाडी येथील आहेत. ते एकमेकांना चांगले ओळखतही होते. अनिकेत हा कबड्डी खेळाडू होता त्यातच हे पाच ते सहा जण त्याठिकाणी जात होते. त्यावेळी एकमेकांकडे बघण्यावरून अनिकेत आणि या सहा जणांचा वाद झाला होता. हा वाद मिटविण्यातही आला होता. पण काही दिवसापुर्वी संशयित मंगेश आरतेच्या वाढदिवसादिवशी पुन्हा वाद उफाळून आला होता. त्यातूनच संशयितातील काहीजणांना अनिकेतने झापले होते. त्यामुळे हा राग या सहाही जणांच्या मनात होता आणि या सहाही जणांनी अनिकेतचा गेम करण्याचा निर्णय घेतला गेल्या तीन दिवसापासून ते अनिकेतच्या मागावर होते. मंगळवारी अनिकेत जीमला जात असताना सहा जणांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला आणि ते पळून गेले. त्यानंतर सांगली शहर पोलिसांनी या सहाही जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सांगली शहर पोलीसचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर गोडे, केशव रणदिवे, प्रमोद खाडे, महादेव पोवार, विनायक शिंदे, प्संदीप पाटील, संतोष गळवे, मच्छिंद्र बर्डे, गौतम कांबळे, योगेश सटाले, यांनी पार पाडली.
अल्पवयीन असल्याचा पुरावा तात्काळ हजर
दरम्यान या सहाही जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी आमची मुले अल्पवयीन असल्याचा पुरावाच दाखल केला आणि त्यानंतर पोलीस यंत्रणाही हादरली आणि यातील चारजण अल्पवयीन निघाले. यातील एकजण तर अवघ्या 15 वर्षाचा आहे.