Sangli : सांगली कारागृहात आढळला दारू, गांजा अन् मोबाईल
सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल: कारागृह प्रशासनाकडून घटनेची गंभीर दखल
सांगली प्रतिनिधी
सांगली कारागृहाच्या आवारातील टॉवर क्रमांक दोनच्या खाली गवतामध्ये दारू, गांजा आा†ण दोन मोबाईल असा 840 रूपयांचा ऐवज आढळून आला. कारागृहातील कैद्यांना देण्याच्या उद्देशाने कोणीतरी तेथे ठेवले असल्याचा अंदाज कारागृह प्रशासनाने व्यक्त केला आहे. या वस्तू आढळून आल्यानंतर तात्काळ याची कारागृह प्रशासनाने दखल घेतली आणि अज्ञातांविरूध्द सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कारागृहात मोबाईल, गांजा आणि दारू कशी येते. याबाबत अनेक सरस कथा सांगितल्या जातात. याप्रकरणी कोल्हापूर येथील कारागृहातील अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर कारागृह प्रशासनाला सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सांगली कारागृहातही कडक तपासणी करण्यात येते. त्यातच रविवारी पाच रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास टॉवर क्रमांक दोनजवळ असणाऱ्या गवतात दारूची बाटली, एका पुडीत गांजा आणि मोबाईल आढळून आला आहे. त्यानंतर याची गंभीरपणे दाखल घेत. वरिष्ठ तुरूंग अधिकारी महादेव होरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरूध्द फिर्याद दिली आहे.
रविवारी जिल्हा कारागृहात असलेल्या टॉवर क्रमांक दोनखाली असलेल्या गवतामध्ये पोलिसांना प्रत्येकी एक लिटरच्या दोन बाटल्यामध्ये थोडी दारू भरलेली असल्याचे आढळून आले. तसेच दोन मोबाईल आणि खाकी रंगाच्या पाकिटात गांजा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अज्ञातावर कारागृह अधिनियमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच कारागृह प्रशासनही आता अलर्ट मोडवर आले असून त्यांनी याचा शोध सुरू केला आहे.