अवकाळी पावसामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा उघड्यावर...
द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान तर रब्बी मधील शाळु, हरभरा भुईसपाट
रवीकुमार हजारे / खंडेराजुरी
गेले चार दिवस सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मिरज पूर्व भाग, कवठेमंकाळ, तासगाव, जत खानापूर ,आटपाडी त्या दुष्काळी परिसरात अत्यंत कमी पाण्यामध्ये शेतकरी राजाने अत्यंत कष्टातून द्राक्ष शेतीत फुलवली आहे. चालू वर्षी पाऊस कमी असून सुद्धा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र चांगले पीक घेतले होते. पण निसर्गाने मात्र होत्याचं नव्हतं केलं असे चित्र जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात दिसत आहे.
जिल्ह्याच्या द्राक्ष पट्ट्यातील सोनी, मालगाव, करोली ,तासगाव, मनेराजुरी, येळावी ,बेळंकी, हिवरे, पळशी, लिंगनूर ,बेडग ,उमराणी, पलूस ,वाळवा ,जत, कोंगनोळी आधी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मार्केटिंगची द्राक्ष तयार केली जातात. चालुवर्षी सुद्धा आगाप छाटणी घेऊन शेतकऱ्यानी प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करून उत्तम प्रतीची द्राक्षे तयार केली होते. अनेक भागांमध्ये केरळ, मद्रास, बेंगलोर ,आंध्रप्रदेश येथील व्यापाऱ्यांनी येऊन तीनशे ते पाचशे रुपये प्रति पेटी (4kg) असा दरही ठरवला होता. फळ छाटणीनंतर अनेक द्राक्षबागा 90 दिवसाच्या वर असल्याने मालामध्ये चांगली शुगर, गोडी येत होती. काही दिवसात ह्या मालाची विक्री होणार होती. द्राक्ष पिक हे हाता तोंडाला आले होते. दुष्काळी पट्ट्यात द्राक्ष पिक हे एकमेव शेतकऱ्यांच्या संसाराचा आर्थिक कणा आहे. वर्षभर काबाडकष्ट केलेल्या द्राक्ष बागातून येणाऱ्या उत्पन्नातून पुढील वर्षी मुलांच्या शाळेचा खर्च, कपडे,घर ,मुलीचे लग्न, औषध दुकानदार, बँका ,सोसायटीचे कर्ज, सावकारी कर्ज, किराणा दुकानदार , मंजूर खर्च आधी देऊन यावर्षी तरी शेती उत्पादनातून संसाराचा खर्च आणि द्राक्ष बागेचा खर्च यांचा मेळ लागतो का हे जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांने स्वप्न पाहिले होते.
पण ते नियतीला व निसर्गाला मान्य नसावं . अचानक विजा कडकडू लागल्या जोरदार वाऱ्यासह गेले चार दिवस दुष्काळी पट्ट्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने अक्षरशः द्राक्ष पट्ट्यातील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. कधी दिवसा तर कधी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षाचे मनी क्रॅक होऊ लागले . अनेक निर्यात क्षम बागांच्या घडामध्ये पाणी राहिल्याने कुज होऊ लागली आहे, बुरशी येत आहे, दावण्या या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. तडे गेल्याने द्राक्ष बागेमध्ये वास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत अवकाळी पावसाने अक्षरशा त्यांचा संसार उघड्यावर पाडलयाने अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः रडु कोसळले आहे.
तसेच जत, तासगाव ,मिरज पूर्व भाग, कवठेमंकाळ, पंढरपूर, सोलापूर, विजापूर या द्राक्ष पट्ट्यात बेदाण्यासाठी सोडलेल्या अनेक द्राक्ष बागा या छाटणीनंतर 30 ते 45 या दिवसांमध्ये आहेत. त्या फ्लॉवरिंग, फुलोरा या स्टेजमध्ये असल्याने या अवकाळी पावसाने फुलकळी गळून पडल्याने त्या बागाचे सुद्धा प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. मार्केटिंगच्या द्राक्ष बागा पिकवण्यासाठी एकरी तीन लाखाचा खर्च येतो तर बेदाणासाठी दोन लाखाचा खर्च येतो. पण या अवकाळी पावसाने मात्र या जगाच्या पोशिंदाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी राजा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे.
या अवकाळी पावसाने प्रचंड कहर केल्याने जोमात असणारे हरभरा, शाळू, ज्वारी हे पीक सुद्धा अक्षरशः भोईसफाट झाले आहे. चालू वर्षी शाळुचे दर 70 ते 75 रुपये प्रति किलो झाल्याने शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणात या दुष्काळपटया मध्ये शाळु पिकाची लागण केली आहे. पण या अवकाळी पावसाने व जोरदार वाऱ्याने शाळू अक्षरशः भोईसपाट झाला आहे.
द्राक्ष बागेची लवकर छाटणी घेतली तरीही व लेट छाटणी घेतली तरीही निसर्गाशी सामना करावा लागतोच.
या निसर्गाच्या चक्रात मात्र जगाचा पोशिंदा शेतकरी राजा चे आर्थिक बजेट मात्र कोलमडून पडले आहे . लाखो रुपये खर्च करून पिकवलेली द्राक्ष शेती संकटात सापडली आहे. आता अवकाळी पावसाने शेकडो हेक्टर द्राक्ष बागाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा मदत देऊ असे नेतेमंडळी फक्त आश्वासन देतील. पण शेतकऱ्यांना सरकारकडून यावेळी मोठ्या मदतीची मात्र अपेक्षा आहे.
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा तडाका दहा हजार हेक्टर वरील द्राक्षबागांना बसला आहे यामुळे सुमारे दीड हजार कोटींचे नुकसान झालेले आहे. गतीने पंचनामे सुरू असून त्याचा अहवाल हिवाळी अधिवेशनापूर्वी शासनाला सादर करण्यात येणार आहे झालेल्या नुकसानीची भरपाई शासन करणार का हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. पण सरकारकडून दिलासा मिळेल या अपेक्षेने सध्या शेतकऱ्यांचे लक्ष हिवाळी अधिवेशनाकडे लागले आहे.