Sangli : गुगवाड धम्मभूमी येथे भव्य धम्म परिषदेचे आयोजन; देशभरातून भिखू संघ दाखल होणार
जत, प्रतिनिधी
अथर्व चंद्रकांत सांगलीकर ट्रस्ट गुगवाड (ता. जत ) यांच्या वतीने धम्मभूमीच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी भव्य धम्मपरिषद आयोजित केली आहे. भिखू संघ, महास्थविर, स्थवीर, श्रामनेर, धम्माचार्य, बौद्धचार्य व विविध क्षेत्रातील देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उद्योगपती ऍड. सी. आर. सांगलीकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले, रविवारी सकाळी ८.३० वाजता धम्म ध्वजारोहण, बुद्धमूर्ती पूजा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन, पूज्य भिखू संघाच्या हस्ते धम्मपरिषदेचे उदघाटन करण्यात येणार आहे. "भावनिक समतोल जोपासणे व भावनिक कल्यानामध्ये बौद्ध धम्माच्या विचारांचे अनुकरण करणे" या विषयावर मान्यवारांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
दरम्यान, गुगवाड येथे उभारण्यात आलेल्या धम्मभूमी मुळे देशभरात जत तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. बाहेरील देशातील लोकांनी याठिकाणी भेटी दिल्या आहेत. यापुढे विपश्या केंद्र, वाचनालय, यासह विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. जत तालुक्याच्या वैभवात भर पडावी, अशी धम्मभूमी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना वाटावे. शिवाय, पश्चिम महाराष्ट्रात बौद्ध धम्म वाढविण्यासाठी प्रयत्न करू, असेही ऍड. सी. आर. सांगलीकर यांनी सांगितले. यावेळी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कांबळे व जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे -पाटील, आदी उपस्थित होते.