For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crop Damage : द्राक्षबागांना अवकाळीचा फटका, पाणी साचल्याने मशागतीची कामे अर्धवट

02:06 PM May 26, 2025 IST | Snehal Patil
sangli crop damage   द्राक्षबागांना अवकाळीचा फटका  पाणी साचल्याने मशागतीची कामे अर्धवट
Advertisement

सुरू असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

Advertisement

सोनी : सोनी, भोसे परिसरातील करोली (एम), पाटगाव, धुळगाव परिसरात मागील आठ दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. पंचक्रोशीमध्ये अवकाळी व पूर्व मोसमी पावसाने तळ ठोकल्यामुळे द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असून खरिपाच्या मशागतीची कामे अर्धवट राहिली आहेत.

सततच्या पावसाने द्राक्षबागांमधील औषधांच्या फवारण्या करणे अवघड झाले आहे. सोनी, भोसे परिसरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी व पूर्व मोसमी पावसाने मागील दहा दिवसापासून तळ ठोकला आहे. एप्रिल व मे महिन्यातील कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अखेरीस अवकाळीने शेतकरी सुखावला होता. मात्र सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Advertisement

सध्या खरिपाच्या मशागतीची कामे चालू असतानाच अवकाळीला सुरुवात झाल्यामुळे जमिनीच्या मशागतीची कामे अर्धवट असून शेतीमध्ये वापसा येण्यास किती वेळ लागेल याचा अंदाज करणेच शेतकऱ्यांच्या हातामध्ये राहिले आहे. कारण मान्सून देखील सक्रिय झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यामुळे पेरण्या मात्र लांबणीवर पडणार आहेत. एकूणच सततच्या पावसामुळे व शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या पेरणीचे व्यवस्थापन बिघडणार आहे.

द्राक्ष बागायतदारांच्या अडचणीमध्ये वाढ

द्राक्ष हंगामातील उन्हाळी छाटणी ही द्राक्ष बागेमध्ये घड निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाते. या छाटणीमध्ये ४० ते ६० दिवसांचा कालावधी हा महत्त्वाचा समजला जातो. दरम्यान यावर्षी द्राक्ष हंगाम उशिरापर्यंत चालू राहिल्यामुळे उन्हाळी छाटण्या उशिरा घेण्यात आल्या.

कडक ऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना काही तयार होणे व गटनिर्मितीस अडचण येणार नाही असे वाटत होते. तर मागील दहा दिवसापासून पाऊस पडत असल्यामुळे ४० ते ६० दिवसांमधील द्राक्षबागामध्ये घड निर्मितीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.  या काळामध्ये काही परिपक्व होण्यासाठी उन्हाची गरज असते मात्र सातत्याने असलेल्या ढगाळ वातावरण असल्यामुळे घड निर्मितीसाठी घेण्यात येणाऱ्या औषधांच्या फवारण्या देखील करणे शेतकऱ्यांना अवघड जात आहे.

द्राक्षबागांमध्ये पावसाने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

द्राक्षबागेमध्ये वेलीची पाने सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मागील दहा दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे वेलीवर पाणी साचून राहिले आहे. यामुळे द्राक्ष बागेमध्ये डाऊनी मिल्ड्यू करपा भुरी या रोगांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या कालावमध्ये मध्ये बागेमध्ये रोगाचा शिरकाव होऊ नये म्हणून औषधांच्या फवारण्या घेता आल्या असत्या मात्र पाऊस होत असल्यामुळे औषध फवारणी देखील शक्य नाही. त्यामुळे फळ छाटणीवेळी घड निर्मितीच्या समस्येबरोबरच पाने टिकवण्यासाठी सुद्धा औषधाच्या फवारणीचे व्यवस्थापन करणे शेतकऱ्यांना क्रम प्राप्त आहे.

Advertisement
Tags :

.